बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या चकमकीत झालेल्या मृत्यूप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याबाबत ठाणे पोलिसांनी मंगळवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. मात्र अनेक प्रश्नांवर पोलिसांनी ‘मौन’ बाळगणे पसंत केल्याने त्यांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त होत आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी या प्रकरणातील काही बाबींचा खुलासा केला आहे. अक्षय शिंदे हा तळोजा तुरुंगात होता. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता तळोजा तुरुंगातून त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी पोलीस घेऊन जात होते. बदलापूर पोलिसांचे पथक तळोजा तुरुंगात गेल्यानंतर अक्षय शिंदेला ताब्यात घेतले. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर मुंब्रा बाह्यवळण मार्गावर व्हॅन आल्यानंतर अक्षयने पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्याकडील पिस्तूल हिसकावले आणि पोलिसांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी मोरेंच्या डाव्या पायाच्या मांडीला लागली. त्यावेळी पोलीस पथकातील एका अधिकाऱ्याने स्वसंरक्षणार्थ अक्षयच्या दिशेने एक गोळी झाडली आणि यात त्याचा मृत्यू झाला. आरोपीच्या मृत्यूनंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दोन्हीही प्रकरणांचा तपास ठाणे पोलीस आयुक्त करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, ठाण्यातील पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने ठाणे पोलिसांना निरुत्तर केले. अडचणीचे प्रश्न टाळण्याकडे पोलिसांचा कल दिसून आला, तर काही प्रश्नांची थातुरमातुर उत्तरे देण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पोलिसांनी ही पत्रकार परिषद अवघ्या पाच मिनिटांत उरकली.