आळंदीत पावसाचा हाहाकार; इंद्रायणी नदीचे रौद्ररूप, २५० वारकऱ्यांची सुटका

पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आळंदीत हाहाकार माजवला आहे.
आळंदीत पावसाचा हाहाकार; इंद्रायणी नदीचे रौद्ररूप, २५० वारकऱ्यांची सुटका
आळंदीत पावसाचा हाहाकार; इंद्रायणी नदीचे रौद्ररूप, २५० वारकऱ्यांची सुटका(Photo-X)
Published on

पुणे : पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आळंदीत हाहाकार माजवला आहे. इंद्रायणी नदीने रौद्ररूप धारण केले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे इंद्रायणी नदीवरील सर्व चारही प्रमुख पूल पाण्याखाली गेले असून आळंदी शहरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटकाळात विविध धर्मशाळा आणि दर्शन मंडपांमध्ये अडकलेल्या सुमारे २५० वारकऱ्यांची आळंदी आपत्कालीन नगरपरिषदेच्या विभागाने युद्धपातळीवर बचावकार्य राबवून सुरक्षित ठिकाणी सुटका केली आहे.

नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने शहरातील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. दुपारपर्यंत तीन पुलांवरून पाणी वाहत होते, मात्र त्यानंतर चौथ्या पुलालाही पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने आळंदी शहराचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला असून शहराकडे येणारी आणि बाहेर जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. या महापुराचा फटका नदीकाठच्या संपूर्ण परिसराला बसला असून भक्त पुंडलिक मंदिर, घाट परिसर, नदीकाठावरील दुकाने, हरी हरेंद्र मठ, देविदास धर्मशाळा, ज्ञानेश्वरी मंदिरालगतचा परिसर, शनी मंदिर परिसर, भराव रस्ता आणि सिद्धबेट परिसर पूर्णपणे जलमय झाला आहे.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मंगळवारी पंढरपूरकडे प्रस्थान होणार असल्याने आळंदीत सध्या वारकरी दाखल झाले आहेत.

मात्र, या मुसळधार पावसामुळे घाटावर उभारण्यात आलेले कपडे बदलण्यासाठीचा मंडप आणि तात्पुरती स्वच्छतागृहे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने पालखी सोहळ्याच्या व्यवस्थापनासमोर प्रशासनाची मोठी कसोटी लागली आहे. नदीकाठावरील दुकानदारांनीही आपली दुकाने सोडून साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांना सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. आळंदी आणि देहूत सध्या जाणे अत्यंत धोकादायक असल्याने वारकऱ्यांनी तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये आणि १० जुलै रोजी वारी पुण्यात पोहोचल्यावर वारकऱ्यांनी तिथे थेट सहभागी व्हावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. सध्या राज्य शासन, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा समन्वयाने काम करत असून घाट परिसरात बॅरिकेड्स उभारून नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी भाविक आणि वारकऱ्यांना नदीपात्र किंवा बंद पुलांवर न जाण्याचा सक्त इशारा दिला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in