महाराष्ट्र रुग्णशय्येवर! ४१ लाख रुग्णांना उच्च रक्तदाब २० लाख रुग्ण मधुमेहाने ग्रस्त 

बदलती जीवनशैली, मानसिक तणाव यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे भयावह चित्र राज्यात आहे.
महाराष्ट्र रुग्णशय्येवर!  ४१ लाख रुग्णांना उच्च रक्तदाब  २० लाख रुग्ण मधुमेहाने ग्रस्त 
Published on

गिरीश चित्रे / मुंबई 

बदलती जीवनशैली, मानसिक तणाव यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे  भयावह चित्र राज्यात आहे. हाय ब्लडप्रेशर, डायबिटीस, मुख कर्करोग, स्तन कर्करोग, गर्भाशय मुख कर्करोग अशा विविध आजारांनी राज्यातील जनता ग्रस्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ४१ लाख ५६ हजार ३८२ रुग्णांना हाय ब्लडप्रेशर तर २० लाख ९ हजार ४०४ रुग्ण डायबिटीसने ग्रासले आहे. ८,२१३ रुग्णांना मुख कर्करोग, ३,३१२ रुग्णांना स्तन कर्करोग आणि ४,११७ रुग्णांमध्ये गर्भाशय मुख कर्करोग असल्याचे निदान झाल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. 

दरम्यान, या सगळ्या रुग्णांवर वेळीच उपचार केल्याने सगळे रुग्ण ठणठणीत बरे झाल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह, मुख कर्करोग, स्तन कर्करोग, गर्भाशय मुख कर्करोगाचे निदान झालेल्या रुग्णांवर सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये उपचार सुरु आहेत. बदलती जीवनशैली, मानसिक तणाव, अपुरी झोप याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून उच्चरक्तदाब असलेल्या रुग्णांची संख्या अन्य आजारांच्या तुलनेत अधिक आहे. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येतो. 

७४ टक्के मृत्यू असंसर्गजन्य आजारांमुळे

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, हृदयविकार, पक्षाघात, कर्करोग, तीव्र श्वसन रोग आणि मधुमेह यासह जगभरातील सर्व मृत्यूंपैकी ७४ टक्क्यांहून अधिक मृत्यू असंसर्गजन्य आजारांमुळे होतात.  एनसीडीमुळे शहरी आणि ग्रामीण लोकसंख्येमध्ये आणि सर्व सामाजिक-आर्थिक स्तरांमध्ये लक्षणीय विकृती आणि मृत्यू होतो. राजाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत असंसर्गजन्य आजाराविषयी मोठ्या प्रमाणात जागृती केली जाते. प्राथमिक असवस्थेत निदान झाल्यास या आजारांवर नियंत्रण मिळविणे आणि उपचाराने हे आजार बरे होतात.

असंसर्गजन्य आजाराचा धोका

- तंबाखूचा वापर (धूम्रपान)

- अल्कोहोलचा वापर

- अस्वास्थ्यकर आहार

- अपुरी शारीरिक हालचाल 

- वायू प्रदूषण (घरातील आणि बाहेरील)

logo
marathi.freepressjournal.in