जादूटोण्याच्या नावाखाली ४० लाखांची फसवणूक; चौघांना अटक; अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा

जादूटोणा, देवदेवस्की आणि अघोरी उपायांच्या नावाखाली तिघांना सुमारे ४० लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार अलिबाग शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली असून, प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या पथकाकडून सुरू आहे.
जादूटोण्याच्या नावाखाली ४० लाखांची फसवणूक; चौघांना अटक; अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा
Published on

अलिबाग : जादूटोणा, देवदेवस्की आणि अघोरी उपायांच्या नावाखाली तिघांना सुमारे ४० लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार अलिबाग शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली असून, प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या पथकाकडून सुरू आहे.

फसवणूक करणाऱ्यांमध्ये महेश यशवंत मोरे, त्यांची पत्नी अपूर्वा मोरे, मानसपुत्र मिहीर मांजरेकर उर्फ मिहीर मोरे आणि सागर कुंड यांचा समावेश आहे. या टोळीने अडचणीत असलेल्या लोकांचा विश्वास संपादन करून, जादूटोणा व धार्मिक उपायांद्वारे समस्या सोडवण्याचे आमिष दाखवले.

फिर्यादी बांधकाम व्यावसायिकाचे पनवेल येथे वास्तव्य असून, अलिबाग तालुक्यात त्यांचे काम सुरू होते. त्यांच्या अडलेल्या रकमा मिळवून देण्यासाठी या टोळीने विविध उपायांचे आमिष दाखवत वेळोवेळी ३८.५० लाख रुपये उकळले. तसेच, दुसऱ्या कुटुंबाकडून कौटुंबिक वाद मिटवण्याच्या नावाखाली २.२५ लाख रुपये, तर तिसऱ्या व्यक्तीकडून १.२९ लाख रुपये उकळण्यात आले.

विशेष बाब म्हणजे, या मांत्रिकांनी ग्राहकांचा विश्वास संपादन करून एक जेसीबी व एक थार गाडीही स्वतःकडे घेतली, असे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात "महाराष्ट्र नरबळी, अघोरी प्रथा, आणि जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३" तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींना दोन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in