अलिबागचा पांढरा कांदा आला हो! मुंबई, नवी मुंबईसह पुणे बाजारात विक्रीसाठी रवाना

गुणधर्मयुक्त आणि चविष्ट असलेला अलिबागचा पांढरा कांदा तयार होऊन बाजारात जाण्यास सज्ज झाला आहे.
अलिबागचा पांढरा कांदा आला हो! मुंबई, नवी मुंबईसह पुणे बाजारात विक्रीसाठी रवाना

धनंजय कवठेकर/अलिबाग

गुणधर्मयुक्त आणि चविष्ट असलेला अलिबागचा पांढरा कांदा तयार होऊन बाजारात जाण्यास सज्ज झाला आहे. नवी मुंबई, मुंबईसह पुणे येथील बाजारात पंधरा दिवसांत सुमारे १५ खंडी कांदा विक्रीसाठी रवाना करण्यात आला आहे. यातून जवळपास अडीच लाख रुपयांहून अधिक आर्थिक उलाढाल होणार असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

अलिबाग तालुक्यातील कार्ले येथील कांद्याला चांगली पसंती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील पांढऱ्या कांद्याला पर्यटकांसह स्थानिकांकडून मागणी आहे. येथील निम्म्याहून अधिक शेतकरी कापणीची कामे झाल्यावर आठ ते दहा दिवसात कांद्याची लागवड करतात.

अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळा येथील सफेद कांदा औषधी गुणधर्म असलेला एक चांगल्या प्रतीचा कांदा म्हणून ओळखला जातो. या कांद्याला रायगड जिल्ह्यासह पुणे, मुंबई, नवी मुंबईच्या बाजारात मोठी मागणी वाढली आहे. कांदा चांगल्या प्रतीचा व्हावा यासाठी येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात मेहनत घेत असतात. स्थानिक बाजारपेठांबरोबरच तालुका, जिल्ह्यातील बाजारापेठांमध्येही कार्ले येथील कांद्याला मागणी आली आहे.

खंडीच्या हिशोबात विक्री

एक खंडी म्हणजे कांद्याच्या ८० माळी असून, त्या १६ हजार रुपयांनी विकण्यात आल्या आहेत. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कांदा बाजारात पाठविण्यास सुरुवात झाली आहे. पंधरा दिवसांत १५ खंडी म्हणजे एक हजार २०० हून अधिक कांद्याच्या माळी विकल्या आहेत. यातून अडीच लाख रुपयाचे उत्पन्न शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहे. गतवर्षी डिसेंबर, जानेवारी महिन्यामध्ये जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. जास्त थंडीही जाणवत होती. बदलत्या हवामानामुळे पांढऱ्या कांद्याला कीडरोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती होती. मात्र, यंदा कांद्याचे उत्पादन समाधानकारक असून, कांद्याचा आकारही चांगला आला असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

तीन लाखांचा निव्वळ नफा

दोन ते तीन महिन्यांच्या हंगामात कांद्यांचे उत्पादन निघते. कांदा लागवड करण्यासाठी प्रचंड मेहनत आहे. कांद्याचे बी लावणे, रोपे वाफ्यावर लावून कांद्याची लागवड केली जाते. त्यानंतर कांद्यावर औषध फवारणी व सुफला खताची मात्रा दिली जाते. त्यासाठी खर्चही खूप येतो. परंतु, एकूण खर्चासहीत अडीच ते तीन लाख रुपयांचा फायदा झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काही शेतकरी कांदा परिपूर्ण होण्यापूर्वीच त्याच्या माळी तयार करून बाजारात आणतात. त्यामुळे परिपूर्ण झालेल्या कांद्याला बाजारात भाव मिळत नाही. शासनाने यंदा कांद्याला जीआय मानांकन दिला आहे. यातून शेतकऱ्यांना भाव मिळेल, अशी आशा आहे. मात्र, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन योग्य पद्धतीने नियोजन केले पाहिजे, असे मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

कांदा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तयार झाला. सुकविण्यापासून त्याची माळ तयार करण्याचे काम झाल्यावर कांदा बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे. पुणे, मुंबई येथील बाजारासह स्थानिक बाजारातदेखील तो पाठविला आहे. यंदा कांद्याचे उत्पादन चांगले आले आहे.

- सतीश म्हात्रे, कांदा उत्पादक शेतकरी

logo
marathi.freepressjournal.in