शिरीष पवार/मुंबई
मूळ शिवसेना कुणाची हा वाद अद्याप सर्वोच्च न्यायालयात सुटला नसला तरी, महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राज्यात चौफेर कामगिरी करीत हे वृत्त लिहिले जाईपर्यंत ४७ जागांवर विजय आणि १० जागांवर आघाडी, अशा एकूण ५७ जागांवर बाजी मारल्याचे चित्र होते.
महायुतीच्या जागावाटपात ८१ जागा लढवलेल्या शिंदे गटाने ७० टक्के स्टाईक रेट राखून विद्यमान ४० आमदारांपैकी ३९ आमदारांना विजयाच्या रथावर पुन्हा बसविले. मुंबई-ठाण्यासह कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही लक्षणीय विजय मिळविलेला शिंदे गट हाच खरी शिवसेना असल्याचा दावा छातीठोकपणे करण्याचे बळ शिंदे समर्थकांना मिळण्याबरोबरच महायुतीच्या अंतर्गत वाटाघाटींतही शिंदे यांची बाजू वरची राहील, असा या निकालाचा अर्थ लावता येईल.
मुंबई-ठाण्यासह कोकणात पालघर, भिवंडी ते कर्जत आणि महाड, दापोली ते रत्नागिरी- राजापूर, कुडाळ- सावंतवाडी असे ठळक अस्तित्व शिंदे गटाने दाखविले आहे. पश्चिम महाराष्ट्रात पाटण, खानापूर, कोरेगाव आणि उत्तर महाराष्ट्रात अक्कलकुवा, साक्री, मालेगाव, नांदगाव ते चोपडा-जळगाव-पाचोरा भागात शिंदे सेनेने पकड घट्ट केली आहे. मराठवाड्यात परांडा ते पैठण, वैजापूर, भोकरदन तसेच कळमनुरी-हादगाव पट्ट्यात शिंदे सेनेला विजय मिळाला आहे. वास्तविक पाहता या भागाने शिवसेनेला अनेक वर्षे साथ दिली असून आता हा भाग शिंदे गटाकडे वळला आहे. याचा मोठा फटका ठाकरे सेनेला बसला आहे. विदर्भातही डिग्रस ते रामटेक- भंडारा भागात शिंदे सेनेचे बळ दिसून आले. त्यामुळे शिवसेनेचा मूळ मतदार शिंदे यांच्यासोबत की ठाकरे यांच्यासोबत, या वादात शिंदे सेनेची बाजू वरचढ बनली आहे.
उमेदवारांमध्ये बुलडाण्याचे संजय गायकवाड (मताधिक्य ८४१), नेवासा येथे विठ्ठल लांघे (मताधिक्य ४०२१), करवीरचे चंद्रदीप नरके (मताधिक्य १९७६) आणि कुर्ला येथील मंगेश कुडाळकर वगळता अन्य उमेदवारांचे मताधिक्य हे किमान ५५८४ मतांहून जास्त होते.
शहाजीबापूंचा पराजय
शिंदे गटाचे गुवाहाटी वारीतील म्होरके शहाजीबापू पाटील यांचा सांगोला मतदारसंघात शेकापचे बाबासाहेब देशमुख यांनी तब्बल २५ हजार ३८६ मतांनी पराभव केला. काय डोंगर, काय झाडी, काय हाटील, सगळे एकदम ओक्केमधी हाय, ही त्यांची ध्वनिमुद्रित फीत चांगलीच गाजली होती. ठाकरे यांची सोबत सोडून शिंदे यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांपैकी पराभूत झालेल्यांत ते एकमेव असल्याचे चित्र रात्री साडेसातपर्यंत होते. शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत हे परांडामध्ये २५७५ मतांनी आघाडीवर होते. तर, मंत्री अब्दुल सत्तार हे सिल्लोडमधून २४२० मतांनी विजयी झाले.