
पुणे : पुण्यातील महाज्योतींसारख्या सरकारी संस्था आणि एमपीएससी तसेच यूपीएससी क्लास चालकांकडून खंडणी मागितल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रदीप कणसे यांनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केला. दरम्यान राज्यात आणि विशेषतः पुण्यात असणाऱ्या शासकीय संस्था, क्लासेस चालक आणि स्पर्धापरिक्षार्थी विद्यार्थी यांना त्रास देणारा कोणी नवा 'आका' तयार होत आहे का? त्याला कोण पाठीशी घालणारे कुणी अजून 'मोठा आका' आहे का? सरकार याकडे खरोखरच गांभीर्याने पाहत आहे का? या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन पुण्यातील स्पर्धा परिक्षा क्षेत्रात 'परळी पॅटर्न' राबवला जातोय का हे समोर यायला हवे, असे कणसे म्हणाले.
या शासकीय संस्थांना व क्लासेस चालकांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणात नाव समोर येणारा महेश घरबुडे आणि धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके, बाळासाहेब सानप व यात समावेश असलेल्या इतर लोकांची नक्की काय लिंक आहे? याचा तपास व्हावा, अशी मागणी कणसे यांनी केली.
विविध प्रकारच्या सरकारी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना पूर्व प्रशिक्षण देता यावे, यासाठी या संस्थांकडून निविदा प्रक्रिया राबवून क्लासेसची निवड करण्यात येते. परंतु अलीकडे या संस्थाना ब्लॅकमेल करून आपल्या मर्जीतील क्लासेस चालकांना हे काम मिळवून देण्यासाठी दबाव आणल्याची, तसेच या संस्थांना आणि निवड झालेल्या क्लासेसचालकांना खंडणी मागितल्याची प्रकरणे समोर येत आहेत.
महेश घरबुडे नामक व्यक्ती व त्याच्या साथीदारांचे नाव यामध्ये समोर येत आहे, असा आरोप कणसे यांनी केला आहे. यावेळी प्रदीप कणसे यांनी महेश घरबुडे यांचे काही व्हॉट्सॲप चॅट तसेच नेत्यांसोबतचे फोटो सुद्धा दाखवले. यासोबतच महाज्योतीचे प्रकल्प संचालक यांनी सुद्धा महेश घरबुडे यांच्या विरोधात नागपूर येथील बजाज नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. बहुजन समाजाचा सामाजिक, आर्थिक विकास व्हावा यासाठी काही संस्थांची निर्मिती करण्यात आली.
सारथी, बार्टी आणि महाज्योती अशा संस्था आहेत, मात्र या संस्था चालकांना तसेच खासगी क्लासेसला चालकांकडून खंडणी मागितल्याच्या दोन तक्रारी दाखल झालेल्या आहेत. एक तक्रार १५ जानेवारीला करण्यात आली आहे, तर दुसरी तक्रार २० जानेवारीला देण्यात आले आहेत. ही तक्रार महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. त्याच्या विद्यावेतनातील काही भाग मागितल्याची तक्रार त्यांनी दिलेली आहे. दुसरी तक्रार ही पुणे शहरातील महाज्योतीचे प्रकल्प संचालक यांनी सुद्धा महेश घरबुडे या व्यक्तीविरोधात आहे. या दोन तक्रारी मिळून देखील त्यावरती कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.
संस्था व क्लासेस चालकांना खंडणी मागितल्याचे आरोप असणाऱ्या महेश घरबुडे याच्यासोबत लक्ष्मण हाके, बाळासाहेब सानप हे सातत्याने सोबत दिसतात. जून २०२४ मध्ये हा महेश घरबुडे वडीगोद्री (जि. जालना) येथील लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनात सातत्याने सोबत होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर याठिकाणी झालेल्या धनंजय मुंडे यांच्या मेळाव्यात महेश घरबुडे याने भाषण केले होते, असा दावा कणसे यांनी केला आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या तालुका परळी (जि. बीड) येथील विद्यार्थ्यांना लोकसभा, विधानसभा मतदानासाठी परळीला घेऊन जाण्याची जबाबदारी महेश घरबुडेवर होती असे समोर येत आहे. मागील सरकारच्या काळात धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री असताना त्यांनी बार्टी संस्थेत आपल्या मर्जीतील अनेक लोकांच्या नियुक्त्त्या केल्याचे सांगण्यात येत असल्याचा दावाही कणसे यांच्याकडून केला जात आहे.
त्यामुळे या शासकीय संस्थांना व क्लासेसचालकांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणात नाव समोर येणारा महेश घरबुडे आणि धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके, बाळासाहेब सानप व यात समावेश असलेल्या इतर लोकांची नक्की काय लिंक आहे? याचा तपास व्हावा, अशी मागणी कणसे यांनी केली.
धनंजय मुंडेंच्या मेळाव्यात महेश घरबुडेचे भाषण
संभाजी ब्रिगेडचे प्रदीप कणसे यांनी सांगितले की, धनंजय मुंडे यांचा पुण्यात बालगंधर्व या ठिकाणी मेळावा झाला होता. त्या मेळाव्यात महेश घरबुडे यांनी भाषण केले होते, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे जे परळीतील विद्यार्थी आहेत. त्यांना मतदानासाठी घेऊन जाण्याचे काम आणि जबाबदारी महेश घरबुडे वरती होती, अशी माहिती असल्याचेही कणसे यांनी यावेळी सांगितले. पोलीस तपासात सर्व माहिती पुढे आणतील, आम्ही केलेल्या आरोपांवर चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.