आंबा घाटात एसटीसह अवजड वाहनांची वाहतूक बंद; गंभीर स्वरूपाच्या भेगा पडल्याने दुर्घटनेचा धोका

मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच-१६६) आंबा घाटात रस्त्याला गंभीर स्वरूपाच्या भेगा पडल्या आहेत. रस्त्यालगत सुमारे १०० मीटर खोल दरी असल्याने रस्ता खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
आंबा घाटात एसटीसह अवजड वाहनांची वाहतूक बंद; गंभीर स्वरूपाच्या भेगा पडल्याने दुर्घटनेचा धोका
Published on

रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच-१६६) आंबा घाटात रस्त्याला गंभीर स्वरूपाच्या भेगा पडल्या आहेत. रस्त्यालगत सुमारे १०० मीटर खोल दरी असल्याने रस्ता खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी १२ ऑगस्टपासून आंबा घाटातून जाणाऱ्या एसटी, प्रवासी बस आणि सर्व प्रकारच्या अवजड वाहनांची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, हलक्या वाहनांना स्वतःच्या जबाबदारीवर आणि नियंत्रित वेगाने प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटातील कि.मी. ६९.५०० ते ६९.६०० दरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजूस मोठ्या भेगा पडल्या आहेत. या ठिकाणी दोन्ही बाजूंना सुमारे १०० मीटर खोल दरी असल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.

अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग

एसटी बसेस आणि अवजड वाहनांसाठी रत्नागिरी-हातखंबा-पाळी-अणुस्कुरा घाट-राजापूर/कोल्हापूर तसेच स्थानिक प्रशासनाने भुईबावडा घाट किंवा फोंडा घाट हे पर्यायी मार्ग सुचविण्यात आले आहेत. आंबा घाटाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवरील चेकपोस्टवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. एनएचएआयला धोक्याचे फलक आणि रात्रीच्या वेळी दिवे व रेड ब्लिंकर्स लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in