दानवे-खैरे यांच्यात अखेर दिलजमाई; छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली ठाकरे गटाची एकजूट

शिंदे गट आणि भाजपने नव्याने त्या संबंधात चाचपणी सुरू केली. दरम्यान, आज खुद्द अंबादास दानवे थेट चंद्रकांत खैरे यांना भेटायला आले आणि त्यांनी खैरे यांचा सत्कार करून पेढे भरवले. खैरे यांनीही दानवे यांन पेढा भरवला. त्यामुळे दोन शिवसेना नेत्यांचे आता मनोमिलन झाले असून, आता दोन्ही नेत्यांनी एकजुटीने निवडणुकीच्या तयारीला लागले असल्याचे जाहीर केले.
दानवे-खैरे यांच्यात अखेर दिलजमाई; छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली ठाकरे गटाची एकजूट

विशेष प्रतिनिधी / मुंबई

छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार आणि ठाकरे गटाचे नेते आणि उमेदवार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा वाद सर्वश्रुत आहे. त्यामुळे दानवे-खैरे या दोघांनीही लोकसभेच्या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली. परंतु ठाकरे गटाने अखेर खैरे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे दानवे नाराज होते. त्यामुळे ते नेमकी काय भूमिका घेणार, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात होते. त्यातून बऱ्याच वावड्याही समोर आल्या. यावर दानवे यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचेच स्पष्टीकरण दिले. अखेर आज दानवे आणि खैरे यांचे मनोमिलन झाले असून, दानवे यांनी खैरे यांचा सत्कार करून पेढे भरविले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना पुन्हा मजबूत झाली आहे.

काही काळापूर्वी अंबादास दानवे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष होते आणि चंद्रकांत खैरे खासदार होते, तेव्हापासून शिवसेनेच्या या दोन नेत्यांमध्ये सख्य नाही. कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांच्यातील वाद उफाळून येत असे. अनेकदा पक्षश्रेष्ठींनी त्यांची वाद मिटविले. परंतु त्यांचा एकमेकांवरील राग कायम राहिला. विशेष म्हणजे शिवसेनेत उभी फूट पडली. जिल्ह्यातील आमदारांसह शिवसेनेचे बरेच नेते शिंदे गटात गेले. परंतु दानवे आणि खैरेंचे मतभेद असून, दोघेही उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले.

दानवे यांनी लोकसभेच्या उमेदवारीचा दावा केला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी थेट माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनाच पसंती दिली. त्यामुळे दानवे नाराज झाले होते. या नाराजीतून त्यांनी खैरे यांचा प्रचारही करणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर नाराजी दूर करण्याचे आव्हान उभे ठाकले होते. त्यातच अंबादास दानवे यांच्याभोवती शिंदे गट आणि भाजपनेही गळ टाकला होता. परंतु त्यांनी निष्ठा सोडली नाही. ते आपण ठाकरे गटासोबतच कायम असणार, अशी घोषणा त्यांनी केली. शिंदे गट आणि भाजपने नव्याने त्या संबंधात चाचपणी सुरू केली. दरम्यान, आज खुद्द अंबादास दानवे थेट चंद्रकांत खैरे यांना भेटायला आले आणि त्यांनी खैरे यांचा सत्कार करून पेढे भरवले. खैरे यांनीही दानवे यांन पेढा भरवला. त्यामुळे दोन शिवसेना नेत्यांचे आता मनोमिलन झाले असून, आता दोन्ही नेत्यांनी एकजुटीने निवडणुकीच्या तयारीला लागले असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेला बळ मिळाले आहे.

खैरे, दानवे एकनिष्ठ

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे. परंतु दीड वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पडली. जिल्ह्यात मोठा गट एकनाथ शिंदेंसोबत गेला आणि ते पुन्हा सत्तेत पोहोचले. मात्र, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे एकनिष्ठ राहिले. खरेतर जवळपास पाच शिवसेना आमदारांनी साथ सोडूनही हे दोघे डगमगले नाहीत. आता त्यांच्यात दिलजमाई झाल्याने शिवसेनेचा ठाकरे गट आता लोकसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे.

विरोधकांमध्ये रस्सीखेच

ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर केल्याने खैरे निवडणुकीच्या प्रचाराला लागले आहेत. मात्र, महायुतीत सध्या लाथाळ्या सुरू झाल्या आहेत. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचा या जागेवर दावा कायम आहे. परंतु ही जागा भाजपला हवी आहे. त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड प्रयत्नशील असून, त्यांच्या वरिष्ठांशी गाठीभेटी सुरू आहेत. मात्र, या जागेवरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये मतैक्य झालेले नाही. महायुती एकीकडे जागेसाठी भांडत आहे आणि दुसरीकडे सक्षम उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी अंबादास दानवे यांनाही फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in