समृद्धी महामार्गावर पोलिसांची समृद्धी; अंबादास दानवेंचा व्हिडीओ ट्विट करत गंभीर आरोप

महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांना अडवून वाहन चालकांकडून वसूली केली जात असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.
समृद्धी महामार्गावर पोलिसांची समृद्धी; अंबादास दानवेंचा व्हिडीओ ट्विट करत गंभीर आरोप

राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी समृद्धी महामार्गावर पोलिसांची समृद्धी सुरु असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांना अडवून वाहन चालकांकडून वसूली केली जात असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. पोलिसांकडून वाहनचालकांची कशाप्रकारे वसूली सुरु असते याचा व्हिडिओ दानवे यांनी ट्विट केला आहे. दानवे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सुरु असल्याची माहिती महामार्ग पोलिस अधिक्षक अनिता जमादार यांनी दिली आहे.

नागूपर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होऊन पाच महिन्याचा काळ लोटला आहे. कमी वेळेत जास्त अंतर पार करण्यासाठी हा महामार्ग उपयोगी ठरले अशी अपेक्षा होती. मात्र या महामार्गावर पोलिसांचीच समृद्धी सुरु असल्याचे दिसून येत आहे. कारण विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांचा वसूली करतानाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. यावेळी दानवे यांनी गंभीर आरोप देखील केले आहेत. "समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाल्याची वल्गना सरकारची होती. पण रोजगार असलेल्या लोकांना अशी 'समृद्धी' येईल, हे नव्हतं सरकारने सांगितलं. गतिमान महाराष्ट्र कसा? तो असा!.." असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दानवे यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओत एक पोलीस कर्मचारी वाहनचालकाकडून काही तरी घेऊन खिशात घातल असल्याचं दिसत आहे. दुसऱ्या ठिकाणी देखील दोन पोलीस असंच करत असल्याचं दिसत आहे. वाहनांचे चालक आणि क्लिनर यांना खाली उतरवून त्यांच्याकडून काहीतरी घेऊन ते खिशात घातल्याचेही या व्हिडिओत दिसत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in