"मी दिलगिरी व्यक्त करण्यास तयार, पण..." अंबादास दानवेंचं उपसभापती निलम गोऱ्हेंना पत्र

निलंबन मागं घ्यावं, यासाठी अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना पत्र लिहिलं आहे.
"मी दिलगिरी व्यक्त करण्यास तयार, पण..." अंबादास दानवेंचं उपसभापती निलम गोऱ्हेंना पत्र

मुंबई: विधानपरिषदेमध्ये अपशब्द वापरल्याप्रकरणी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन केलं आहे. त्याचबरोबर त्यांना विधानभवन परिसरात येण्यासही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान हे निलंबन मागं घ्यावं, यासाठी अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना पत्र लिहून आपण दिलगिरी व्यक्त करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले?

अंबादास दानवे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, "मी असं पत्र दिलं आहे की, मी माझ्या वतीनं आणि माझ्या पक्षप्रमुखांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. एकांगीपणा झालेला आहे. पण आता जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, शेतकरी, कामगार, माताबहीणी, कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन महत्त्वाचं असतं आणि तुम्ही माझा नैसर्गिक अधिकार हिरावून घेत आहात. हे चुकीचे आहे. माझ्याकडून सभागृहाच्या प्रथा-परंपरांचा, संस्कृतीचा अपमान झाला असेल, तर मी सभागृहात दिलगिरी व्यक्त करण्यास तयार आहे. पण मला शेतकऱ्यांचे, जनतेचे प्रश्न मला मांडूद्या. शेवटी विरोधी पक्षनेत्याला संविधानिक दर्जा आहे. त्याच्या शब्दाला महत्त्व असतं. सरकार दरबारी विरोधी पक्षनेता म्हणजे जनतेचा आवाज असतो. तुम्ही जनतेचा आवाजच दाबणार असाल, तर ते चुकीचं आहे. जनतेचा आवाज व्यक्त करण्यासाठी सभागृहात दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी आहे.

त्यांना दणका बसलाय पण....

ते पुढं म्हणाले की, आंदोलन बऱ्याच ठिकाणी झालीत. मुंबईत सुद्धा आंदोलन झालेत. ग्रामीण भागातही तिच परिस्थिती आहे. कारण ही जनतेची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. कारण भाजपनं एकांगी पद्धतीनं हे केलंय. लोकसभेमध्ये त्यांना दणका बसलाय, त्यानंतरही ते ठिकाण्यावर आले नाहीत, अशी टीकाही अंबादास दानवेंनी भाजपवर केली.

logo
marathi.freepressjournal.in