अंबादास दानवेंना दिलासा; निलंबन कालावधी दोन दिवसांनी केला कमी

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना २ जुलैला पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते.
अंबादास दानवेंना दिलासा; निलंबन कालावधी दोन दिवसांनी केला कमी
PM
Published on

मुंबई : राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना २ जुलैला पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते. मात्र, दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने गुरुवारी निलंबनाचा कालावधी दोन दिवसांनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून दानवे हे विरोधी पक्षनेते म्हणून पुन्हा एकदा सक्रिय होणार आहेत.

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हिदुत्वावरून भाजपवर जोरदार टीका केली होती. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे पडसाद मंगळवारी राज्यातील पावसाळी अधिवेशनात उमटले. विधान परिषदेत विधान परिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करत महाविकास आघाडीला लक्ष्य केले. यावेळी प्रसाद लाड यांनीही मविआवर जोरदार टीका केली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. हमरीतुमरीवर आलेल्या नेत्यांनी अपशब्दांचा वापर केला आणि परिषदेची गरिमा मलीन झाली. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांविरोधात आव्हानात्मक भाषा वापरली गेली. सभागृहात दोन्ही बाजूंनी गोंधळ होत असताना सभापती नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी १ जुलैला कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले होते. दुसऱ्या दिवशी २ जुलैला राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यासाठी सकाळी विशेष कामकाज सुरू असतानाच शिवीगाळ प्रकरणावरून प्रसाद लाड यांनी दानवे यांच्यावर कारवाईची मागणी केली. नाहीतर सत्ताधारी असूनही आम्ही कामकाज चालवू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

दानवे यांच्या निलंबन कारवाईसाठी विधान परिषद सभागृह एकूण तीन वेळा तहकूब झाले. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेच्या ठरावान्वये अंबादास दानवे यांचे निलंबन होत असल्याचे जाहीर केले. दानवेंचे निलंबन झाल्यावर विरोधकांनी गदारोळ केला. सभापतींवर पक्षपातीपणाचा आरोप करत त्यांचा निषेध केला. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग करत दिवसभरासाठी कामकाजावर बहिष्कार घातला होता.

अंबादास दानवे यांनी केलेल्या शिवीगाळप्रकरणी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारीच राज्यातील माता-भगिनींची माफी मागितली. दरम्यान, अंबादास दानवे यांनीही दिलगिरीनामा सादर केल्याने संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अंबादास दानवे यांच्यावरील निलंबनाची कारवाई पाच दिवसांऐवजी तीन दिवस करण्यात आल्याचे जाहीर केले. दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने निलंबनाचा

कालावधी दोन दिवसांनी कमी केल्याचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in