छत्रपती संभाजीनगर : मराठा समाज ईव्हीएमच्या क्षमतेपेक्षा खूपच अधिक उमेदवार उभे करू शकतो, अशी भीती व्यक्त करून तशी स्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्यासाठी निवडणूक आयोगाने सल्ला द्यावा, अशी मागणी एका पत्राद्वारे धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी ६ मार्च रोजी हे पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, असंतुष्ट मराठा समाजाने जर ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) च्या क्षमतेपेक्षा जास्त उमेदवार उभे केले तर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मतपत्रिका वापरून निवडणुका घ्याव्या लागल्यास मतपेट्या आणि मनुष्यबळाची समस्याही निर्माण होऊ शकते. तसेच यासाठी अतिरिक्त वाहने, त्यांची सुरक्षा याचीही गरज भासेल. सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या जागेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, परभणीतील चाटे पिंपळगाव गावात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी, आंदोलक मराठा समाजाच्या सांगण्यावरून, १५५ जणांनी उमेदवारी दाखल केली होती. निवडणूक अधिकाऱ्यांना खूप जास्त उमेदवारांचे आव्हान होते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीला स्थगिती दिली. या निर्णयाचे पत्र परभणी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.