प्रस्ताव पाठवा, मदत देऊ; पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आश्वासन

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर संकट उभे येऊन ठाकले आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ६० लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले आहे. २०२५-२६ या वर्षांसाठी केंद्र सरकारने कर हप्त्यापोटी ३,१३२ कोटी महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. २,२०० कोटींची मदत केली आहे.
(Photo - X/Amitshah)
(Photo - X/Amitshah)
Published on

अहिल्यानगर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर संकट उभे येऊन ठाकले आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ६० लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले आहे. २०२५-२६ या वर्षांसाठी केंद्र सरकारने कर हप्त्यापोटी ३,१३२ कोटी महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. २,२०० कोटींची मदत केली आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारला पंचनाम्याचा सविस्तर अहवाल पाठवावा, त्यानंतर पंतप्रधान मोदी लगेचच मदत जाहीर करतील, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिले.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे- पाटील सहकारी साखर कारखान्याचे नूतनीकरण आणि लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील तसेच पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांच्या संयुक्त पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी लोणी अहिल्यानगार येथे पार पडले.

यावेळी अमित शहा म्हणाले की, “शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारही उपाययोजना करत आहे. २,२१५ कोटींचा रिलीफ फंड महाराष्ट्र सरकारने दिला आहे. त्यामध्ये १० हजार रुपयांची प्रत्येकी रोख मदत आणि २५ किलो धान्य महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येत आहे. तसेच कर्जमाफीची होणारी वसूलीदेखील रोखण्यास सांगण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकामधील हे त्रिमूर्ती आहेत, यातील कोणीही व्यापारी नाही. पण हे तिघेही व्यापाऱ्यापेक्षा कमी नाहीत. मला पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी बोलावले आणि विचारले की, केंद्र सरकार महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी काय करेल? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी कालच माझ्याबरोबर एक महत्वाची बैठक केली. तेव्हा मी पंतप्रधान मोदींच्यावतीने त्यांना आश्वासन दिले की, महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल पाठवावा. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसाठी मदत करायला जराही वेळ लावणार नाहीत, ते मदत जाहीर करतील. कारण महाराष्ट्राच्या जनतेने शेतकऱ्यांचे हित जोपासणारे सरकार निवडून दिलेले आहे.”

“माझ्यासह देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदार, खासदार पद्मश्री पाटील आणि पद्मविभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी एकत्र आलो आहेत. या प्रदेशाचे नाव आता अहिल्याबाईंच्या नावाशी जोडले गेले आहे. जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते, तेव्हा भाजप-शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरचे नाव अहिल्याबाई होळकर यांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला. असे निर्णय फक्त छत्रपतींच्या वारशाचे पालन करणारेच घेऊ शकतात,” असेही अमित शहा म्हणाले.

मापात पाप करणाऱ्या कारखान्यांना आता दाखवतोच - फडणवीस

साखर कारखान्यांच्या अडीअडचणीत सरकार त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. पण आपत्तीकाळात शेतकऱ्यांसाठी आपण केवळ नफ्यातून ५ रुपये बाजूला काढा, अशी सूचना केली. त्यावर काही मंडळींनी गहजब सुरू केला आहे. काही लोक मनाने फार छोटे झाले आहेत. मी आता काही कारखाने शोधून काढले आहेत, जिथे शेतकऱ्यांच्या ऊसाच्या वजनात काटा मारला जातो. त्यांना आता दाखवतोच, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रति टन १० रुपये आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५ रुपये कर आकारण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाला काही कारखानदारांनी जोरदार विरोध केला. याचाच धागा पकडून मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारखानदारांना इशारा दिला.

फडणवीस म्हणाले की, “केवळ ५ रुपये शेतकऱ्यांसाठी बाजूला काढा, असे सांगितले होते. फार तर २५ लाख एका कारखान्याला द्यावे लागले असते. मात्र, असा गहजब निर्माण केला गेला की, शेतकऱ्यांकडूनच पैसे काढून घेतले जात आहेत. मी आता काही कारखाने शोधून काढले आहेत, जिथे शेतकऱ्यांच्या ऊसाच्या वजनावेळी काटा मारला जातो. त्या कारखान्यांना मी आता पाहतोच. कारखान्याचे मालक शेतकरी आहेत, त्यांच्या मागे उभे राहण्याचे काम सरकार करेल. काही लोक आपत्तीतही राजकारण करत आहेत. सरकार शेतकऱ्यामागे उभे आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आराखडा तयार करतोय. भरीव मदतीसाठी केंद्र मदत करेल. तुम्ही काय केले हे आरशात बघा, जनतेने आम्हाला सेवेसाठी पाठवले आहे आम्ही सेवा करू.”

logo
marathi.freepressjournal.in