वक्फ बोर्ड सुधारणा कायदा मंजूर करून घेणारच!अमित शहा यांनी व्यक्त केला निर्धार

वक्फ बोर्ड कायद्यामुळे देशातील जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, राहुल गांधी व शरद पवार हे वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला विरोध करीत आहेत. तुम्हाला जेवढा विरोध करायचा तेवढा करा. आम्ही ‘डंके की चोट पे’ वक्फ बोर्डाचा कायदा मंजूर करून घेणारच, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परभणीत बुधवारी व्यक्त केला.
वक्फ बोर्ड सुधारणा कायदा मंजूर करून घेणारच!अमित शहा यांनी व्यक्त केला निर्धार
Published on

परभणी : वक्फ बोर्ड कायद्यामुळे देशातील जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, राहुल गांधी व शरद पवार हे वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला विरोध करीत आहेत. तुम्हाला जेवढा विरोध करायचा तेवढा करा. आम्ही ‘डंके की चोट पे’ वक्फ बोर्डाचा कायदा मंजूर करून घेणारच, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परभणीत बुधवारी व्यक्त केला.

शहा पुढे म्हणाले की, कर्नाटकमध्ये अलीकडेच वक्फ बोर्डाने संपूर्ण गाव आपली मालमत्ता असल्याचे जाहीर केले. ४०० वर्षे जुने मंदिर, शेतकऱ्यांची जमिनी व लोकांच्या घरांवर वक्फने आपला दावा सांगितला. त्यामुळे आम्ही वक्फ कायद्यात सुधारणा करण्यासाठी विधेयक आणले आहे. मात्र, राहुलबाबा व पवारसाहेब या विधेयकाला विरोध करीत आहेत. मात्र, आम्ही काही झाले तरी वक्फ कायद्यात सुधारणा करणारच, असे शहा यांनी सांगितले.

इंदिरा गांधी स्वर्गातून आल्या तरी ‘कलम ३७०’ लागू करणे अशक्य

कलम ३७०, मुस्लीम आरक्षण आणि राम मंदिराबाबत काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी त्या पक्षावर जोरदार हल्ला चढविताना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेख केला. दिवंगत इंदिरा गांधी जरी स्वर्गातून येथे आल्या तरी ‘कलम ३७०’ पुन्हा लागू करता येणार नाही, असे शहा म्हणाले.

मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावर शहा म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या चार पिढ्यांनी जरी मागणी केली तरी अल्पसंख्य समाजाला आरक्षण मिळणार नाही. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावरही शहा यांनी हल्ला चढविला. लाल चौकात जाताना भीती वाटते, असे विधान शिंदे यांनी केले होते, त्याचा उल्लेख करीत शहा म्हणाले की, आता तुम्ही तुमच्या नातवंडासोबत जा, तुम्ही सुरक्षित राहाल.

या निवडणुकीतही 'राहुलबाबा'नावाचे विमान कोसळणार

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी राहुल बाबा नावाचे विमान २० वेळा सुरक्षित उतरविण्याचा प्रयत्न केला आणि २० वेळा ते विमान कोसळले. आता महाराष्ट्राच्या निवडणुकीतही २१ व्या वेळेला राहुल बाबा नावाचे विमान कोसळणार आहे, अशी टीका शहा यांनी केली.

अयोध्येत राम मंदिर उभारले जाऊ नये यासाठी काँग्रेसने अनेक वर्षे अडथळे आणल्याचा आरोपही शहा यांनी जिंतूर येथील सभेत केला. आपण राज्यभर दौरे केले, तुम्हाला निवडणुकीचा निकाल ऐकावयाचा असल्यास सांगतो की, या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पानिपत होणार आहे. औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे करण्यास ज्यांनी विरोध केला, त्यांच्यासमवेत शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसले आहेत, अशी टीकाही गृहमंत्र्यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in