शहांच्या रायगड दौऱ्यात तटकरेंचे प्रीतिभोजन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज?

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा हे १२ एप्रिल रोजी रायगड किल्ल्याला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे (डावीकडून)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे (डावीकडून)
Published on

प्राजक्ता पोळ/मुंबई

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा हे १२ एप्रिल रोजी रायगड किल्ल्याला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करणार आहेत. या दौऱ्यात अमित शहा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या रोहा, सुतारवाडी येथील निवासस्थानी भोजनासाठी जाणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुरुवातीला निमंत्रण नव्हते. पण, ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाल्यावर त्यांना निमंत्रित करण्यात आले.

देशात औरंगजेबावरून सुरू असलेल्या वादादरम्यान होणारी ही भेट एक प्रभावी प्रतीकात्मक पाऊल म्हणून पाहिली जात आहे. शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्याविरुद्ध दिलेल्या लढ्याची आणि स्वाभिमानी मराठा साम्राज्याच्या उभारणीची आठवण करून देणारा हा दौरा आहे. या भेटीबाबत जनतेत मोठा उत्साह असून राज्य भाजपचे नेते आणि स्थानिक नेते अमित शहा यांच्यासोबत या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत राजधानी असलेला रायगड किल्ला हे शौर्य, उत्कृष्ट प्रशासन आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाचे प्रतीक आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमासाठी आधी आमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यानंतर शिंदे यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत आणि मंत्री भरत गोगावले यांनाही भोजनासाठी निमंत्रित करण्यात आले.

मंत्री भारत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे यांच्यात रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेले शीतयुद्ध अजूनही थांबलेले नाही. या भेटीदरम्यान खासदार सुनील तटकरे आपल्या कन्या आदिती तटकरे यांना पुन्हा पालकमंत्री करण्यासाठी लॉबिंग करतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रायगड जिल्ह्यातील बहुतांश आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे आहेत. या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे चित्र आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती जाहीर केली होती, मात्र शिंदे यांच्या नाराजीमुळे ती मागे घेण्यात आली होती. त्यामुळे पालकमंत्रिपदाचा वाद आजही प्रलंबित आहे. तटकरे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या शहा यांच्या नियोजित भेटीमुळे शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

गृहमंत्री अमित शहा तटकरे यांच्या निवासस्थानी जात असल्यामुळे एकनाथ शिंदे किंवा भरत गोगावले यांनी नाराज होण्याचे काही कारण नाही. या भेटीकडे राजकीय नजरेतून पाहू नये.

- चंद्रशेखर बावनकुळे (भाजप प्रदेशाध्यक्ष)

logo
marathi.freepressjournal.in