चौरंगी लढतीने गाजणार अमरावती मतदारसंघ; नवनीत राणा, बळवंत वानखेडे, आनंदराज आंबेडकर आणि दिनेश बुब अशी होणार लढत

आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा चांगला जोर आहे. बच्चू कडू हे आधी महायुतीसोबत होते. मात्र नवनीत राणांना विरोध असल्यामुळे महायुतीतून बाहेर पडून त्यांनी दिनेश बुब नामक शिवसैनिकाला मैदानात उतरवले आहे.
चौरंगी लढतीने गाजणार अमरावती मतदारसंघ; नवनीत राणा, बळवंत वानखेडे, आनंदराज आंबेडकर आणि दिनेश बुब अशी होणार लढत
Published on

अविनाश पाठक

अमरावती लोकसभा मतदारसंघात यावेळी चौरंगी सामना होणार हे स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणा या रिंगणात उतरलेल्या आहेत, तर काँग्रेसतर्फे विद्यमान आमदार बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या जिल्ह्यात आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा चांगला जोर आहे. बच्चू कडू हे आधी महायुतीसोबत होते. मात्र नवनीत राणांना विरोध असल्यामुळे महायुतीतून बाहेर पडून त्यांनी दिनेश बुब नामक शिवसैनिकाला मैदानात उतरवले आहे. याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर हे देखील रिंगणात उतरलेले आहेत.

या लोकसभा क्षेत्रात अमरावती, बडनेरा, तिवसा, दर्यापूर, मेळघाट आणि अचलपूर असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सहापैकी एकातही भाजपचा आमदार नाही. तरीही भाजपने जोर लावून ही जागा आपल्याकडे ओढून घेतली आहे. नवनीत राणांना उमेदवारी हेच त्यामागचे कारणही आहे. ही जागा जिंकायचीच या जिद्दीने भाजपचे सर्व स्थानिक नेते कामाला लागलेले आहेत. इथले राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्यासह इतर सर्वच कार्यकर्ते कंबर कसून भिडले आहेत. याशिवाय स्वतः नवनीत राणांचे पती रवी राणा हे देखील आमदार असून त्यांची स्वाभिमान संघटना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलेली आहे.

बच्चू कडू यांची प्रहार संघटना ही देखील या परिसरात चांगले मूळ धरून आहे. त्यांचा राणा दांपत्याला पूर्ण विरोध आहे. त्यामुळेच त्यांनी माझी शिवसैनिक दिनेश बुब यांना मैदानात उतरवले आहे. इथे दलित मुस्लिम आदिवासी कुणबी अशा सर्वच समाजाचे लोक मतदार आहेत. दलितांची इथली संख्या लक्षात घेता आणि रा सु गवई यांची पुण्याई लक्षात घेता आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर हे देखील मैदानात उतरलेले आहेत. खरी लढत ही भाजप आणि काँग्रेस मध्येच आहे. मात्र त्याच वेळी आनंदराज आंबेडकर आणि दिनेश बुब हे कोणाची किती मते खातात आणि कुणाला किती धोका पोहोचवतात त्यावर इथला खासदार ठरणार हे नक्की आहे.

अनेक वर्षांनी उतरविला काँग्रेस उमेदवार

या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य असे आहे की या मतदारसंघात कित्येक वर्षांनंतर काँग्रेसचा उमेदवार आणि भाजपचा उमेदवार आपापल्या चिन्हावर रिंगणात उतरला आहे. आधी ही जागा शिवसेनेकडे असल्यामुळे भाजपाचा उमेदवार कमळावर लढण्याचा प्रश्नच येत नव्हता. तोच प्रकार काँग्रेसबाबतही झाला होता.

मतदारसंघाची पार्श्वभूमी

हा मतदारसंघ जुना काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी मधल्या काळात रिपब्लिकन नेते राजाराम सुकाजी गवई यांचेही चांगलेच वर्चस्व होते. गवई आणि काँग्रेसची युती असायची. आणि काही वेळा काँग्रेस गवईंना साथ देऊन निवडून आणत असे. १९९९ पासून येथे शिवसेनेचा उमेदवार निवडून येत होता. १९९९ आणि २००४ मध्ये शिवसेनेचे अनंत गुढे तर २००९ मध्ये हा मतदारसंघ राखीव झाल्यावर शिवसेनेचेच आनंद अडसूळ इथून विजयी होत होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी आनंद अडसुळांचा पराभव केला होता.

चर्चित चेहरा

२०१९ पर्यंत शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती होती. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. आनंद अडसूळ हे मूळचे मुंबईचे, आजही ते मुंबईतच स्थायिक आहेत. मात्र त्यांची सोय लावायची म्हणून शिवसेनेने त्यांना आधी बुलढाण्यातून आणि नंतर अमरावतीतून राखीव कोट्यातून जागा दिली होती. ते फक्त निवडणूक काळात मतदारसंघात यायचे. नंतर त्यांचे राजकारण मुंबई आणि दिल्लीतूनच चालायचे अशी त्यांच्याबद्दल तक्रार होती. २०१९ च्या निवडणुकीत अमरावतीतील भाजप नेतेच त्यांच्या विरोधात होते. त्याचवेळी नवनीत राणा या अपक्ष म्हणून उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा होता. याचवेळी भाजप नेत्यांनी त्यांना छुपा पाठिंबा देत अडसूळ यांचे पार्सल मुंबईला परत पाठवण्याचा निर्णय घेतला आणि राणांना निवडून आणले. भाजपाने केलेल्या मदतीची जाण ठेवत नंतरच्या काळात नवनीत राणा यांनीही भाजपला साथ दिली होती. विशेषतः कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणून ललकारण्याचे काम करून त्या चर्चित चेहरा बनल्या होत्या. त्यामुळेच भाजपची त्यांची जवळीक वाढली होती. ही जागा आधी शिवसेनेकडे होती. मात्र यावेळी भाजपने आग्रह करून ती आपल्याकडे घेतली आणि नवनीत राणा उमेदवारी दिली.

logo
marathi.freepressjournal.in