

अमरावती : अमरावती स्त्री जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागातील (एनआयसीयू) व्हेंटिलेटरमध्ये पहाटे साडेतीनच्या सुमारास स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत ३ नवजात बाळांचा मृत्यू झाला असून अन्य सहा शिशूंना पुढील उपचारांसाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाल्यानंतर आग लागली. त्यानंतर सर्वत्र धूर पसरला. त्यावेळी ‘एनआयसीयू’मध्ये ३९ नवजात बालकांवर उपचार सुरू होते. त्यापैकी तीन बाळांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला. या घटनेमुळे अमरावती शहरात शोककळा पसरली आहे.दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असे फडणवीस यांनी घोषित केले.
फायर अलार्म गायब
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आग लागल्यास धोक्याची सूचना देणारी रुग्णालयात ‘फायर अलार्म यंत्रणा’ कार्यान्वित नव्हती. कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेल्या आणि एक वर्षापूर्वीच कार्यान्वित झालेल्या या रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा निष्क्रिय असणे ही बाब गंभीर प्रश्न निर्माण करते.
दोषींवर कठोर कारवाई : मुख्यमंत्री
आगीच्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला. या घटनेनंतर सार्वजनिक आरोग्यमंत्री आणि सचिव दोघांनाही तातडीने अमरावती येथे भेट देण्यास सांगितल्याची माहिती यांनी दिली.
या तीन कक्षांमध्ये प्रत्येकी १३ अशा एकूण ३९ नवजात बालकांवर उपचारांची क्षमता आहे. त्यापैकी एका कक्षात आग लागली. या कक्षात एकूण ९ बालके होती. आग लागल्याचे लक्षात येताच ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी या कक्षातील लहान बाळांना तातडिने बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने तीन बालकांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला.
नवीन विभागात आग लागल्याने अनेक प्रश्न
अवघ्या वर्षभरापूर्वीच हा अद्ययावत नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला होता. इतक्या नवीन विभागात आग लागल्यानंतर रुग्णालयातील सुरक्षा आणि अग्निरोधक यंत्रणा तातडीने कार्यान्वित का झाली नाही, असा संतप्त सवाल पालक आणि नागरिकांकडून विचारला जात आहे. नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) कमी दिवसांच्या (प्री-मॅच्युअर), कमी वजन आणि गंभीर अवस्थेतील बाळांवर उपचार केले जातात. उपचार सुरु असलेल्या काही बालकांचे हात आणि पाय भाजल्याची माहिती आहे. त्यांच्यावर सध्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आपात्कालीन सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
व्हेंटिलेटरमध्ये स्फोट कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर आजुबाजूच्या कक्षातील बालकांनाही सुपरस्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आग लागल्यानंतर या कक्षात तैनात असलेले कर्मचारी कुठे गेले होते, याबद्दलही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेमुळे रुग्णालयातील आपात्कालीन सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या सगळ्यावर आता रुग्णालय प्रशासन काय स्पष्टीकरण देणार, हे बघावे लागेल. मात्र, या सगळ्यामुळे नाहक तीन चिमुरड्या जीवांना प्राण गमवावे लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. यावर आता सरकार काही कठोर कारवाई करणार का, हेदेखील पाहावे लागेल.
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा :वडेट्टीवार
अमरावती रुग्णालयातील कथित गैरव्यवस्थेवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ‘अमरावती रुग्णालयाचे ऑडिट झालेले नाही. डॉक्टर नाहीत, औषधे नाहीत; महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवले आहे? खड्ड्यात नेऊन ठेवले आहे,’ असा संताप त्यांनी व्यक्त केला. सर्पदंशाच्या प्रकरणात शाळेच्या संस्थाचालकांवर गुन्हा दाखल केला जात असेल, तर अमरावतीतील प्रकरणात आरोग्यमंत्री आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
आगीत मृत्युमुखी पडलेल्या नवजात बाळांच्या आई-वडिलांचे नाव
१) पूजा बोरगे यांचा मुलगा (रा. पुलगाव, वर्धा)
२) गायत्री प्रफुल चोपडे यांचा मुलगा (रा. मुरखेड, तालुका अंजनगाव सुरजी) ३) किरण बेठेकर यांची मुलगी (रा. बोराळा तालुका चिखलदरा)