बच्चू कडूंनी मागितली अमरावती लोकसभेची जागा; रवी राणांनी बजावले! म्हणाले...

महायुतीत अमरावतीची जागा आम्हाला हवी आहे. नवनीत राणा यांनी हवं तर 'प्रहार'च्या तिकीटावर अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी, असे कडू यांनी म्हटले आहे.
बच्चू कडूंनी मागितली अमरावती लोकसभेची जागा;  रवी राणांनी बजावले! म्हणाले...

लोकसभा निवडणुका जसजशा तोंडावर येत आहेत तसतसे राजकीय पक्ष निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. अशात आमदार बच्चू कडू यांनी मोठे विधान केले. "आम्ही सध्या कोणाच्याही बाजूने नाही. आमच्या पक्षाला राजकीय ताकद जेथून मिळेल, त्यावरुन आम्ही आमची भूमिका ठरवू", असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. शिवाय, खासदार नवनीत राणा यांनी आमच्या तिकीटावर लढावे असेही ते म्हणाले. त्यावर आता अपक्ष आमदार रवी राणा यांनी कडू यांना त्यावरून सुनावले.

काय म्हणाले होते कडू?

बच्चू कडू यांनी महायुतीत अकोला, अमरावतीसह लोकसभेच्या तीन जागांची मागणी केली आहे. महायुतीत अमरावतीची जागा आम्हाला हवी आहे. नवनीत राणा यांनी हवं तर 'प्रहार'च्या तिकीटावर अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी, असे कडू यांनी म्हटले आहे.

...तरच विधानसभेला मदत करु : राणा

कडू यांच्या विधानावर भाष्य करताना, "बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे एकमेव आमदार वेगळ्या वाटेवर...कारण त्यांना 'प्रहार'वर विजयी होणार याची शाश्वती नाही", असे रवी राणा म्हणाले. तसेच, कडू यांना महायुती धर्म पाळावा लागेल. त्यांनी नवनीत राणा यांना लोकसभेला मदत केली, तर त्यांना विधानसभेला मदत करु. मात्र, त्यांनी लोकसभेला राजकारण केल्यास त्याचे वेगळे परिणाम होतील, असा इशारा देखील राणा यांनी दिला.

दरम्यान, कडू यांनी लोकसभेला 3 आणि विधानसभेला 15 जागांवर लढण्याची इच्छा व्यक्त केली असून 15 जानेवारीनंतर बैठक घेऊन पुढील भूमिका मांडू, असे म्हटले आहे. बच्चू कडू यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला सुरूवात झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in