उलटलेल्या जाहिरातीचा खेळ

कोणतीही जाहिरात प्रतिमानिर्मितीसाठी केली जाते. परंतु एखादी जाहिरात कशी उलटते, याचे उदाहरण म्हणून याकडे पाहावे लागेल
उलटलेल्या जाहिरातीचा खेळ

भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधले संबंध फारसे मधुर राहिलेले नाहीत, याचे संकेत गेल्या काही आठवड्यांपासून मिळत होते. मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी नियुक्त करतानाही एकनाथ शिंदे यांना विश्वासात घेतले जात नाही आणि महसूल तसेच पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या बदल्यांमध्येही एकनाथ शिंदे यांना ठाण्याबाहेर फारसे विचारात घेतले जात नसल्याच्या बातम्या येत होत्या. याचा अर्थ एकनाथ शिंदे हे नामधारी मुख्यमंत्री आहेत आणि सगळे महत्त्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीस हेच घेत आहेत.

याचा दुसरा अर्थ असा की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी सरकार मात्र देवेंद्र फडणवीस चालवत आहेत. अर्थात एकनाथ शिंदे यांना ज्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्रीपद मिळाले आहे, त्या परिस्थितीचा विचार करता यात कुणाला काही वावगे वाटण्याचेही कारण नव्हते. कारण शिंदे यांच्या बंडानंतरही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार फडणवीस होते आणि ऐनवेळी दिल्लीने त्यांचे महत्त्व कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आणि फडणवीस यांना इच्छा नसताना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास भाग पाडले. काही दिवसांच्या नाराजीनंतर फडणवीस सक्रीय झाले आणि मुख्यमंत्रीपदी असताना जशी त्यांची सरकारवर पकड होती, तशीच पकड त्यांनी पुन्हा एकदा मिळवली. सत्ताकेंद्र सहाव्या मजल्यावर असले तरी ते मुख्यमंत्री कार्यालयात नव्हे, तर उपमुख्यमंत्री कार्यालयात असल्याचे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले.

एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेसंदर्भात दावा करणारी जी जाहिरात तमाम मराठी व्रुत्तपत्रांतून प्रसिद्ध झाली त्यानंतर जी चर्चा सुरू झाली आहे, तिचा विचार करताना ही पार्श्वभूमी विचारात घ्यावी लागते. `राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे` इथपासून सुरू झालेले प्रकरण `जनतेच्या चरणी माथा गर्जा महाराष्ट्र माझा` इथपर्यंत येऊन पोहोचले आहे. परंतु एक चूक दुरुस्त करताना नेहमी दुसरी मोठी चूक केली जाते. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपच्या सगळ्या मंत्र्यांची नाराजी ओढवून घेतलेली आहे.

यासंदर्भातील वस्तुस्थितीवर नजर टाकल्यास एकूण प्रकरण समजून घेण्यास मदत होऊ शकेल. मंगळवारी सर्व मराठी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यामध्ये एका सर्वेक्षणाचा हवाला देत, दावा करण्यात आला होता की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी २६.१ टक्के, तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी २३.२ टक्के पसंती आहे. महाराष्ट्रातील ४६.४ टक्के जनता भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी उत्सुक आहे. महाराष्ट्रातील २६.१ टक्के जनतेला एकनाथ शिंदे यांना पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी पाहायचे आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी २३.२ टक्के लोकांची पसंती आहे. महाराष्ट्रातील ४९.३ टक्के जनतेने पुन्हा या दोघांच्या नेतृत्वाला पसंती दर्शवली आहे. या जाहिरातीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या सर्वेक्षणाच्या आधारे दावा करण्यात आला आहे, ते कुणी केले आहे याचा काहीही संदर्भ दिलेला नाही. विशेष म्हणजे शिवसेनेची जाहिरात असूनही त्यात बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही.

ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले. एकनाथ शिंदे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिल्याच्या चर्चा रंगू लागल्या. एकनाथ शिंदे हे फडणवीस यांच्या प्रभावातून बाहेर पडून स्वतंत्रपणे काम करू इच्छितात आणि त्यादृष्टीने त्यांनी टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे, असेही बोलले जाऊ लागले. मंगळवारी सायंकाळी कोल्हापुरात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या सरकारी कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित राहिले नाहीत, त्याचा संबंध या जाहिरातीशी जोडला जाऊ लागला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सर्व वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर जाहिराती प्रसिद्ध झाल्या, त्यामध्ये शिंदे आणि फडणवीस या दोघांचे फोटो, दोन्ही पक्षांची नावे आणि चिन्हे यांचा समावेश आहे. आदल्या दिवशीच्या जाहिरातीच्या अनुषंगाने सारवासारव करताना नव्या जाहिरातीत काही बदल करण्यात आले.

नवीन जाहिरातीत, जनतेचा कौल शिवसेना-भाजप युतीला असल्याचे म्हटले आहे. देशाला विकासाची दिशा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला ८४ टक्के नागरिकांची पसंती आहे. ४९.३ टक्के लोकांची पसंती ही शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाला आहे. प्रमुख विरोधकांना २६.८ टक्के आणि इतरांना २३.९ टक्के लोकांची पसंती आहे. डबल इंजिन सरकारमुळेच राज्याला विकासाला गती येत असल्याचं ६२ टक्के नागरिकांचे मत ४६.४ टक्के नागरिकांची भाजप-शिवसेनेला पसंती दर्शवली आहे. या जाहिरातीसाठी मात्र झी मीडियाच्या सर्व्हेचा संदर्भ देण्यात आला आहे. जो खास करवून घेण्यात आला आहे, याबाबत कुणाही राजकीय जाणकाराच्या मनात शंका असण्याचे कारण नाही.

महाराष्ट्रात २०१४ पासून ‘केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्र देवेंद्र’ अशी घोषणा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात येते. मात्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या या नव्या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो शिवसेनेच्या पहिल्या जाहिरातीत वापरण्यात आला. त्यावरून भाजपचे केंद्रीय नेतृत्त्व माझ्या पाठीशी आहे, असे सांगण्याचा प्रयत्न शिंदेंनी केला आहे. या जाहिरातीत त्यांनी अमित शाह, फडणवीस यांचे फोटो किंवा भाजपच्या कमळाचा फोटोही वापरलेला नाहीत. थेट मोदींचा फोटो वापरून ते केंद्रीय नेतृत्त्वाचा आपल्याला पाठिंबा असल्याचाच संदेश देत आहेत. आणि तसे असल्याशिवाय शिंदे असे धाडस करणार नाहीत. या जाहिरातीच्या अनुषंगाने आणखी काही पैलूंचा विचार केल्यास असे दिसते की, आपली लोकप्रियता कमी झाली नसल्याचे सांगण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेने केलेला हा प्रपंच दिसतो. या जाहिरातीतून शिंदे हे फडणवीसांना आव्हान देत असल्याचे बोलले जाते, पण वास्तवात फडणवीसांना आव्हान देण्याइतकी एकनाथ शिंदे यांची क्षमता दिसत नाही. शिवाय, फडणवीस स्वत:च म्हणाले होते की, आगामी निवडणूक शिंदेंच्या नेतृत्त्वात लढू. म्हणजे, हा शिंदे-फडणवीसांच्या रणनितीचाही भाग असू शकतो. अशा चर्चांमध्ये लोकांना गुंतवून ठेवून अन्य पातळ्यांवरील सरकारच्या अपयशापासून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न म्हणूनही याकडे पाहावे लागेल. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर त्यांची जी प्रतिमा महाराष्ट्रात निर्माण झालीय. विशेषत: ठाकरे गटाकडून त्यांना मिंधे सरकार, खोके सरकार वगैर म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर अशा फोकनाड सर्वेक्षणांच्या आधारे खोटे दावे करून, बंडानंतरही राज्यात आमची लोकप्रियता कमी झालेली नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न म्हणूनही याकडे पाहावे लागेल.

कोणतीही जाहिरात प्रतिमानिर्मितीसाठी केली जाते. परंतु एखादी जाहिरात कशी उलटते, याचे उदाहरण म्हणून याकडे पाहावे लागेल. आपली लोकप्रियता दाखवण्याच्या नादात शिंदेंनी फडणवीसांना दुय्यम लेखले आणि दुस-या दिवशी सारवासारव करताना भाजपच्या मंत्र्यांना दुखावले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in