नाशिक येथे संतप्त जमावाकडून अतिक्रमण पथकावर दगडफेक

या कारवाईत जवळपास पंधरापेक्षा अधिक झोपड्या हटवण्यात आल्या.
नाशिक येथे संतप्त जमावाकडून अतिक्रमण पथकावर दगडफेक

नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकावर आज संतप्त जमावकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. अतिक्रमण काढण्याचे काम सुरु असताना हा सगळा प्रकार घडला आहे. यानंतर पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांची धरपकड करण्यात आली. तसेच अतिक्रमण पथकाकडूनक दंगल नियंत्रण पथकाच्या बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईत जवळपास पंधरापेक्षा अधिक झोपड्या हटवण्यात आल्या.

नाशिक महापालिकेकडूनक गेल्या काही दिवसांपासून शहरातील अतिक्रमण करण्याची कारवाई करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील पंचवटी विभागातील गंगा गोदावरी, गौरी पटांगण येथे झोपडपट्टी काढण्याचे काम सुरु होते. त्यावेळी देखील याच प्रकारे दगडफेक झाली होती. यावेळी अतिक्रमण विभागातील कर्मचारी जखमी झाले होते.

आज सकाळपासून नाशिक महापालिकेने पुन्हा ही कारवाई हाती घेतली आहे. शहराच्या पेठरोड परिसरातील झोपड्या हटवण्याचे काम सुरु आहे. यावेळी संतप्त जमावाकडून कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी अतिक्रमण पथकातील जेसीबीवर देखील दगडफेक झाली. यात जेसीबीचे मोठे नुकसान झालं आहे. यानंतर तात्काळ याठिकाणी दंगल नियंत्रण पथकाला बोलावण्यात आलं. यानंतर काही नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं. या कारवाईत जवळपास पंधरा झोपड्या हटवण्यात आल्या असून पोलीस बंदोबस्तात ही कारवाई दिवसभर सुरु राहणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

दगडफेक करणाऱ्या काही युवकांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या दगडफेकीत कोणीही जखमी झालं नसलं तहीही जेसीबीचे मोठं नुकसान झालं आहे. यानंतर अशाप्रकारे कोणीही व्यत्यत आणल्यास त्याच्यावर देखील गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा मनपा अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in