उपमुख्यमंत्री अजित पवार व गिरीश महाजन यांच्यात पुण्यात तासभर चर्चा

महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण होऊन आघाडीचे नेते प्रचाराला लागले आहेत. सांगली आणि मुंबईतील काही मतदारसंघावरून महाविकास आघाडीत कुरबुरी आहेत. मात्र, इतर मतदारसंघात आघाडीचा प्रचार सुरू झाला आहे. इकडे सत्ताधारी महायुतीमधील पक्षांमध्ये जागावाटपावरून अजूनही मतैक्य होऊ शकलेले नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार व गिरीश महाजन यांच्यात पुण्यात तासभर चर्चा

पुणे : भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शनिवारी पुण्यात सुमारे एक तास चर्चा झाली. यावेळी धाराशिवचे राणा जगजितसिंह पाटील हेही उपस्थित होते. पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख जवळ आली तरी महायुतीमधील काही जागांचा पेच सुटलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे.

महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण होऊन आघाडीचे नेते प्रचाराला लागले आहेत. सांगली आणि मुंबईतील काही मतदारसंघावरून महाविकास आघाडीत कुरबुरी आहेत. मात्र, इतर मतदारसंघात आघाडीचा प्रचार सुरू झाला आहे. इकडे सत्ताधारी महायुतीमधील पक्षांमध्ये जागावाटपावरून अजूनही मतैक्य होऊ शकलेले नाही. नाशिक, सातारा, सिंधुदुर्ग-रत्नागिरी, कल्याण व मुंबईतील काही मतदारसंघातील उमेदवार अजूनही जाहीर होऊ शकलेले नाहीत.

दरम्यान, या भेटीबाबत महाजन म्हणाले, मी पुण्यात रात्री आलो होतो, दादा आहेत, असे समजल्यावर त्यांना भेटायला आलो होतो. राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. येत्या दोन ते तीन दिवसांत महायुतीमधील जागा वाटप जाहीर होईल, असेही गिरीश महाजन यांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in