मोठी बातमी; 'आनंदाचा शिधा योजना' अखेर बंद

सणासुदीला सर्वसामान्यांच्या जीवनात ‘गोडवा’ आणणारी राज्य सरकारची लोकप्रिय योजना ‘आनंदाचा शिधा’ आता बंद करण्यात आली आहे.
मोठी बातमी; 'आनंदाचा शिधा योजना' अखेर बंद
Published on

मुंबई : सणासुदीला सर्वसामान्यांच्या जीवनात ‘गोडवा’ आणणारी राज्य सरकारची लोकप्रिय योजना ‘आनंदाचा शिधा’ आता बंद करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सुरू करण्यात आलेली ‘आनंदाची शिधा’ योजना आता फडणवीस सरकारने बंद केली आहे. त्यामुळे महायुती सरकारने आता लोकांचा आनंद हिरावून घेतल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. ‘आनंदाच्या शिधा’च्या माध्यमातून रेशन कार्डधारकांना अवघ्या १०० रुपयांत एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चणा डाळ आणि एक लिटर पामतेल मिळत होते. आता ही योजना बंद करण्यात आल्यामुळे रेशनकार्ड धारकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी काल मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये ‘आनंदाचा शिधा’ योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे ही योजना बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, सरकारकडून अधिकृतरित्या कोणतेही ठोस कारण देण्यात आलेले नाही. रामनवमी, श्रीगणेश चतुर्थी, दसरा आणि दिवाळी अशा सणांना आनंदाचा शिधा देण्यात येत होता. मात्र ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आलेला अतिरिक्त आर्थिक भार यामुळे सरकारने ही योजना बंद केल्याची जोरात चर्चा सुरू आहे.

राज्यातील निवडणुकीआधी महायुती सरकारकडून काही महत्त्वाच्या योजना सुरू केल्या होत्या. त्यात ‘आनंदाचा शिधा’ या योजनेचाही समावेश होता. मात्र, आता नवीन सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये आनंदाचा शिधा योजनेला काहीशी बगल देण्यात आली आहे. एकीकडे फडणवीस-शिंदे यांच्यात योजनांना स्थगिती देण्यावरून खटके उडत असतानाच, शिंदेंनी सुरू केलेली आणखी एक योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंद केल्यामुळे आता या वादाला नवी फोडणी मिळाली आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेचा फटका?

‘आनंदाचा शिधा’ योजनेला ‘लाडकी बहीण’ योजनेचा फटका बसल्याची चर्चा आहे. राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येऊन इतर योजनांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही योजना बंद झाल्यानंतर राज्यातील विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते भाई जगताप म्हणाले की, “निवडणुकीपूर्वी लोकांना गाजर दाखवण्यासाठी योजना आणल्या गेल्या आणि आता त्या बंद केल्या जात आहेत. यापूर्वी ‘शिवभोजन थाळी’ बंद करण्यात आली आणि आता ‘आनंदाचा शिधा’देखील बंद करण्यात आला आहे.”

logo
marathi.freepressjournal.in