आंगणेवाडी जत्रोत्सवाची धूम उत्साहात सुरू; आई भराडीच्या दर्शनास मुख्यमंत्र्यांसह नेते, खासदार, आमदार, नगरसेवक उत्सुक

गेले अनेक दिवस सुरू असलेली तयारी आंगणे कुटुंबीय आणि जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असून, परिसर भक्तांनी आणि चाकरमान्यांनी गजबजून गेला आहे. यात्रेत सुमारे आठ लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आंगणेवाडी जत्रोत्सवाची धूम उत्साहात सुरू; आई भराडीच्या दर्शनास मुख्यमंत्र्यांसह नेते, खासदार, आमदार, नगरसेवक उत्सुक
Published on

मालवण : कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील भराडीमातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक आतुर झाले आहेत. वस्त्रालंकारांनी सजलेले देवीचे रूप पाहण्याचे भाग्य जत्रेच्या दिवशी लाभत असल्याने भाविकांचा महापूर सोमवारी आंगणेवाडीत उसळणार आहे. नवसाला पावणारी व भवानीचे रूप असलेल्या भराडीमातेच्या दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांसह विविध पक्षांचे राजकीय नेते, खासदार, आमदार, महापौर आणि नगरसेवक उपस्थित राहणार असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गेले अनेक दिवस सुरू असलेली तयारी आंगणे कुटुंबीय आणि जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असून, परिसर भक्तांनी आणि चाकरमान्यांनी गजबजून गेला आहे. यात्रेत सुमारे आठ लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

वीज वितरण कंपनीकडून अखंडित वीजपुरवठ्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली असून अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख, कार्यकारी अभियंता सौरभ माळी, उपकार्यकारी अभियंता राहुल लिमकर, शाखा अभियंता प्रमोद मार्बते, मुख्य तंत्रज्ञ रमेश राठोड यांच्यासह ४ शाखा अभियंते आणि ४० वायरमन कार्यरत असणार आहेत. एसटी महामंडळाकडून १३५ यात्रा स्पेशल बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सोमवारी रात्री ९ ते १२ या वेळेत धार्मिक विधीसाठी ओटी भरण्याचा कार्यक्रम बंद राहणार आहे. सर्व भाविकांनी संयम आणि शिस्त पाळून दर्शनरांगेतूनच देवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सचिव काका आंगणे, कार्याध्यक्ष बाळा आंगणे आणि बाबू आंगणे यांनी केले आहे.

४८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच

मंदिर परिसरात १२ तर जत्रा परिसरात ३६ अशा एकूण ४८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे यात्रेचे छायाचित्रण करण्यात येणार असल्याची माहिती अनंत आंगणे यांनी दिली. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे सुलभ होणार आहे. आरोग्य विभागाकडूनही विशेष दक्षता घेण्यात आली असून कार्डियाक व्हॅन आणि १०८ रुग्णवाहिका तैनात असतील. वीज वितरण कंपनीकडून हंगामी व्यापाऱ्यांना तात्पुरती वीजजोडणी देण्याचे काम सुरू आहे.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी पोलीस विभागाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. टेहळणी मनोरे उभारण्यात आले असून साध्या वेशातील महिला व पुरुष पोलीस कर्मचारी यात्रेवर लक्ष ठेवून असतील. मान्यवर व्यक्तींसाठी मुख्य स्वागत कक्षाजवळ स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

फुलांची लक्षवेधी सजावट

देवी भराडीचा महिमा जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशभर पोहोचला आहे. त्यामुळे आंगणेवाडीच्या यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. यात्रोत्सवानिमित्त सुवर्णालंकारांनी आणि भरजरी साडीने मातेला सजविण्यात येणार आहे. यात्रेदिवशी मातेचे तेजोमय रूप पाहून भाविक सुखावणार आहेत. गाभाऱ्यात ओट्या भरण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन आंगणे कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे. सभामंडप व गाभाऱ्याचे रूप रेशमी कापडी पडदे आणि विविध फुलांच्या सजावटीने अवर्णनीय असे भासणार आहे.

पहाटे ३ वाजल्यापासून ओटी भरण्यास प्रारंभ

देवीचे दर्शन सुलभ व्हावे, यासाठी ९ रांगांमधून भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी पहाटे प्रथेप्रमाणे धार्मिक विधीनंतर जत्रोत्सवाला सुरुवात होणार असून भाविकांच्या ओट्या भरण्यास पहाटे ३ वाजता प्रारंभ होईल. आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर सजविण्यात आला आहे. भाविकांच्या मनोरंजनासाठी आकाश पाळणे, “मौत का कुआ” यांसारखी खेळणी सज्ज झाली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in