अंगणवाडी सेविकांचे आजपासून बेमुदत आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी मोर्चाचा इशारा

राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी १२ ऑगस्टपासून आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
अंगणवाडी सेविकांचे आजपासून बेमुदत आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी मोर्चाचा इशारा
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : अंगणवाडी सेविकांनी ५२ दिवस राज्यव्यापी संप केल्यानंतर राज्य सरकारने मानधन वाढ देण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र सात महिने उलटले तरी याबाबत ठोस निर्णय न घेण्यात आल्याने राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी १२ ऑगस्टपासून आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनानंतरही सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास २१ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रात ० ते ६ वयोगटातील बालके, गर्भवती व स्तनदा माता यांना पूरक पोषण आहार देणे, पूर्व शालेय शिक्षण या सेवा देणे, तसेच लसीकरण, आरोग्य तपासणी, पोषण व आरोग्य विषयक शिक्षण आदी कामे अंगणवाडी सेविकांमार्फत करण्यात येतात. या योजनेमध्ये सुमारे १ लाख १३ हजार अंगणवाडी केंद्रात २ लाख अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. या अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ, दरमहा पेन्शन, ग्रॅच्युइटी देण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबर २०२३ ते २५ जानेवारी २०२४ पर्यंत ५२ दिवसांचा राज्यव्यापी संप करण्यात आला होता. यावेळी आशा कर्मचाऱ्यांचे मानधनवाढ झाल्यानंतर लगेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात सादर करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. परंतु आश्वासन देऊन सात महिने उलटले तरी मानधन वाढीबाबत कोणताही प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही.

logo
marathi.freepressjournal.in