
मुंबई : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी वाल्मिक कराडला अटक झाली असताना व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जाते. वाल्मिक कराडला काही लोक का घाबरतात, कराडकडे कोणाचे व्हिडीओ आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. कराडची संपत्ती जप्त करण्यात आली असली, तरी एसआयटीने सखोल चौकशी केली तर कराडच्या संपत्तीचे धागेदोरे दूरपर्यंत जातील, असे भाजप आमदार सुरेश धस म्हणाले.
संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली असून आम्हाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवणार, असा इशारा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिला आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, यासाठी शनिवारी मुंबईत मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत जनआकोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ शनिवारी मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय शिंदेंचा मुद्दा उपस्थित करत महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला.
बीडमधील राजकीय हत्या समोर आणणार - धस
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कोणाचे अभय आहे. आरोपी पोलीस कोठडीत असताना आजारपणाचे नाटक करून रुग्णालयात दाखल होत असून हवे तसे उपचार घेत आहेत. देशमुखांच्या हत्येशी संबंधित वाल्मिक कराड याची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. एसआयटीने सखोल चौकशी केली तर कराडच्या संपत्तीचे धागेदोरे दूरपर्यंत जातील, असा गौप्यस्फोट भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवणार असून यापुढेही आम्ही अशीच आंदोलने करणार आहोत. बीड जिल्ह्यातील राजकीय हत्याचे वास्तव टप्प्याटप्प्याने समोर आणणार, असा इशारा धस यांनी दिला.
अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही
अक्षय शिंदे याची निर्घृण हत्या करण्यात आली. अक्षय शिंदे याने बलात्कार केलाच नाही. बलात्कार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली, असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला. बीड जिल्ह्यातील कराडच्या जवळचे पोलीस अजून तिकडेच आहे, त्यांची बदली झाली नाही, तसेच अक्षय शिंदे प्रकरणात अद्याप पोलिसांवर गुन्हा दाखल झाला नाही, असेही आव्हाड म्हणाले.
“ बदलापूर प्रकरण लैंगिक शोषणाचे प्रकरण आहे बलात्काराचे नाही. आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर कुणाला तरी वाचवण्यासाठी करण्यात आला. या प्रकरणात घटनास्थळावरील सीसीटीव्ही गायब झाले. त्याचा ॲॅक्सेस कुणाकडे होता? मी हा विषय सुरुवातीपासून बोलत आहे. त्यामुळे मी बोलायला घाबरत नाही. कुणाला तरी आम्ही न्याय दिला, हे यांना दाखवायचे होते, म्हणून त्यांनी एन्काऊंटर केला. परंतु कोर्टाने त्यांना फटकारले. कोर्टाने सांगूनदेखील अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. माझे स्पष्ट म्हणणे आहे की, अद्याप गुन्हा दाखल झाला नाही आणि होणारदेखील नाही. आरोपी चुपचाप सुटणार,” असे आव्हाड म्हणाले.