अनिक्षा जयसिंघानीने दिली होती अमृता फडणवीस यांना ऑफर; पोलिसांच्या आरोप पत्रात दावा

अनिल जयसिंघानींवरील गुन्हे मागे घेण्यासाठी ही ऑफर देण्यात आली होती.
अनिक्षा जयसिंघानीने दिली होती अमृता फडणवीस यांना ऑफर; पोलिसांच्या आरोप पत्रात दावा

मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या 793 पानांच्या आरोप पत्रात अनिक्षा जयसिंघानी यांनी अमृता फडणवीस यांना मोठी ऑफर दिली होती. असा दावा करण्यात आला आहे. बुकी अनिल जयसिंघानी आणि त्यांची मुलगी अनिक्षा जयसिंघानी यांच्यावर मलबार पोलिसांत यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल जयसिंघानींवरील गुन्हे मागे घेण्यासाठी ही ऑफर देण्यात आली होती. सध्या अनिल जयसिंघानी न्यायालयीन कोठडीत आहेत. तर अनीक्षा यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

अनिक्षा जयसिंघानी यांनी अमृता फडणवीस यांच्याशी चॅटद्वारे संभाषण केले आहे. हे चॅट आरोपपत्रात जोडण्यात आलं आहे. यात अनिक्षा म्हणाली आहे की, माझ्या वडिलांना माहिती आहे की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या विरोधात पोलीस वापरून ते व्हिडिओ खोटे असल्याचा दावा करतील. पण त्याचा काही उपयोग होणार नाही. या चॅटमध्ये अनिक्षाने शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मोदींच्या नावाने धमकी दिली असल्याचं आढळून आलं आहे. या चॅटमध्ये मोठा वाद होईल, यात फडणवीस यांना आपलं पद देखील गमवावं लागेल, असं देखील संभाषण झालं आहे.

या प्रकरणात मदत करण्याच्या बदल्यात अमृता फडणवीस यांना 1 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. त्यांनी ती धुडकावून लावल्यानंतर त्यांना व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत 10 कोटींची खंडणी मागण्यात आली होती. याप्रकरणी अनिक्षा जयसिंघानी आणि तिचा चुलत भाऊ निर्मल यांच्याविरोधत आपोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

अमृता फडणवीस आणि अनिक्षा जयसिंघानी यांच्या मैत्रीपुर्ण संबंध विकसित झाले होते. यानंतर अनिक्षाने अमृता फडणवीस यांना आपले वडील अनिल जयसिंघानी यांच्यावर दाखल गुन्हे आणि तक्रारींमधून त्यांना वाचवण्याची विनंती केली होती. याला अमृता फडणवीस यांनी नकार दिल्याने अनिक्षाने त्यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याची ऑफर दिली होती. अमृता फडणवीस यांनी ती धुडकावून लावल्याने अनिक्षा जयसिंघांनीने त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. या प्रकरणात अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in