मुंबई : कथित १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी देशमुख यांना मुंबईबाहेर नागपूर तसेच उर्वरित देशभरात फिरण्यासाठी यापूर्वी दिलेली सूट आणखी तीन महिन्यांसाठी कायम ठेवली.
कथित खंडणी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना मुंबई हायकोर्टाने सशर्त जामीन मंजूर करताना मुंबईबाहेर जाण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक केले होते. यापूर्वी न्यायालयाने देशमुख यांना पहिल्यांदा मुंबईबाहेर संपूर्ण महाराष्ट्र आणि नवी दिल्लीत जाण्यास दीड महिन्यांची मुभा दिली. त्यानंतर ३१ ऑगस्टपर्यंत संपूर्ण देशभरात जाण्यासाठी परवानगी दिली होती. त्यात वाढ करून ती २ नोव्हेंबर आणि पुढे ३१ जानेवारीपर्यंत वाढविली होती. ही मुदत संपल्याने देशमुख यांनी अॅड. इंद्रपाल सिंग यांच्यामार्फत नव्याने अर्ज दाखल दाखल करून मुदतवाढ मागितली होती. त्या अर्जावर सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली. यापूर्वीही न्यायालयाने परवानगी दिली असल्याने ती ३१ एप्रिलपर्यंत कायम ठेवली.