मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळू लागला आहे. समित कदम यांचे नाव उघड झाल्यानंतर या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर सोमवारी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. ‘गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समित कदम यांनी माझ्याकडे येऊन उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी शपथपत्रावर स्वाक्षरी करण्याचा आग्रह धरला होता. समित यांनी मला ईडी आणि सीबीआयच्या सर्व खटल्यांतून मुक्त करण्याची ऑफर दिली होती. एकतर तुम्ही भाजपमध्ये या किंवा तुरुंगात जा’, असा आरोप अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर केला.
अनिल देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत खळबळजनक खुलासे केले. समित कदम आणि फडणवीस यांची एकत्र छायाचित्रेही त्यांनी दाखवली. नगरसेवक पदावर नसताना कदम यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा का देण्यात आली आहे, असा सवालही देशमुख यांनी केला. कदम इतके महत्त्वाचे व्यक्ती आहेत की, त्यांना सरकारने ‘वाय’ सुरक्षा दिली आहे? कदम यांना माझ्या घरी येईपर्यंत मी आयुष्यात कधी पाहिले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सांगली जिल्ह्यातील मिरजेत गेलात तर फडणवीस आणि कदम यांच्यात काय नाते आहे हे कुणीही सांगू शकेल, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि अजित पवार हे फडणवीसांचे राजकीय विरोधक होते. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि पार्थ पवार यांना अडकवण्यासाठी दबाव टाकण्यात आला. फडणवीस यांनी नेत्यांच्या कुटुंबीयांना खोट्या खटल्यात कसे ओढण्याचा प्रयत्न केला हे यातून दिसून येते. मी शपथपत्रावर सही केली असती तर उद्धव ठाकरे अडचणीत आले असते, असे देशमुख म्हणाले.
माझ्यावर जो प्रयोग झाला तोच प्रयोग एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर राबवला गेला आणि ते प्रयोग यशस्वी ठरले, असा गौप्यस्फोटही देशमुख यांनी केला. माझ्यावर दबावतंत्र वापरून प्रयोग यशस्वी करण्यात फडणवीस यांना यश आले असते, तर मविआचे सरकार तेव्हाच पडले असते, असा दावाही देशमुख यांनी केला.
कोण आहेत समित कदम?
समित कदम हे मूळचे मिरजचे असून ते जनसुराज्य शक्ती पार्टीचे २००८ पासून काम करत आहेत. सध्या ते जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आहेत. समित कदम हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. समित कदम यांनी आतापर्यंत एकही निवडणूक लढलेली नाही. परंतु, आगामी विधानसभा निवडणूकीसाठी ते इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी मिरजमध्ये तसे बॅनर्सही लावण्यात आले होते. समित कदम हे मिरजमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. गेल्यावर्षी त्यांनी दहीहंडी आयोजित केली होती.
समित कदम यांनी आरोप फेटाळले
दरम्यान, समित कदम यांनी देशमुख यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. देशमुख यांनी दाखवलेली छायाचित्रे माझ्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवर उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. देशमुख यांनी काही तपासात्मक माहिती दिली, असा याचा अर्थ होत नाही. देशमुख वेडे झाले आहेत, अशी टीका समित कदम यांनी केली.