
मुंबई : महाराष्ट्रातील गृह राज्यमंत्र्यांच्या स्वत:च्या आईच्या नावाने डान्सबार चालतो. त्यावर कारवाई कोण करणार? आई आणि पत्नीच्या नावे डान्सबार उघडून पोरी नाचवायला तसेच अश्लीलता पसरवायला लाज वाटत नाही का, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार अनिल परब यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला. हिंमत असेल तर माझ्यावर बदनामीचा खटला भरा किंवा हक्कभंग आणून दाखवाच, असे आव्हानही त्यांनी दिले.
मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी कांदिवली परिसरात असणाऱ्या कदम कुटुंबीयांच्या ‘सावली’ या बारचा मुद्दा पुन्हा उचलून धरला. यावेळी अनिल परब यांनी माजी मंत्री रामदास कदम आणि योगेश कदम या पितापुत्रांवर सडकून टीका केली.
“रामदास कदम यांनी कबूल केले की, हा बार माझ्या पत्नीच्या नावाने आहे. त्यामुळे आता बारची मालकी कोणाकडे आहे, याबद्दल कोणताही संभ्रम राहिलेला नाही. गृह राज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने डान्सबार चालतो, तोसुद्धा पोलीस स्टेशनच्या नाकाखाली. हे गृह राज्यमंत्री नवी मुंबईपर्यंत डान्सबारवर रेड करायला जातात. का तर अश्लीलता पसरते म्हणून, अनैतिक धंदा आहे म्हणून, समाजविघातक कृती म्हणून हे रेड करतात. पण स्वत:च्या आईच्या नावाने जो डान्सबार चालतोय, त्यावर कोण कारवाई करणार?,” असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला.
“योगेश कदम यांच्या आईच्या नावाने असलेल्या बारमध्ये बारबाला नाचवल्या जात होत्या, अश्लील नृत्य केले जात होते, पैसे उडवले जात होते. ही सगळी माहिती पोलीस रेकॉर्ड आणि एफआयआरमध्ये आहे. मला माहितीच्या अधिकारातंर्गत ही माहिती मिळाली, त्यामुळे ती खोटी असू शकत नाही. धाड पडली तेव्हा बारमधील २२ बारबाला, २२ गिऱ्हाईक आणि चार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. माझा उल्लेख कदम यांनी ‘अर्धवट वकील’ म्हणून केला आहे. विधानसभेत मी अर्धवट वकील म्हणून बोलत नाही. विधानसभेत मी आमदार म्हणून बोलतो, ही माझी चौथी टर्म आहे. त्यामुळे मला विधानसभा नियम आणि कायदे चांगले माहिती आहेत. मला त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही,” अशी टीकाही परब यांनी केली.
सर्व प्रताप टप्प्याटप्प्याने बाहेर काढू -अनिल परब
“रामदास कदम यांच्या कुटुंबाकडून छापेमारी केल्याचे दाखवले जाते आणि नंतर तोडपाणी केले जाते. ही कदम कुटुंबाची जुनी सवय आहे, आम्ही याला तोडपाणी गँग म्हणतो. म्हणजे त्यांचे आणि त्यांच्या दोन्ही मुलांचे आमच्याकडे भरपूर प्रताप आहेत, हे टप्प्याटप्प्याने बाहेर काढू. प्रदूषण मंडळात किती रेड झाल्या? त्या रेडचे पुढे काय झाले? चाकणमध्ये रेड झाली, त्याचा त्यांना अधिकार होता का? त्यांच्या वैधतेचाही प्रश्न आहे. आता हळूहळू टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी बाहेर काढतो,” असे अनिल परब यांनी सांगितले.
परब यांच्याविरोधात हक्कभंग आणणार - रामदास कदम
“अनिल परब यांच्याविरुद्ध दोन दिवसांत हक्कभंग आणणार आहे. अनिल परब यांनी दादागिरीची भाषा करू नये, मी अशा दादागिरीला भीक घालत नाही. हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखवा. राज्यातले सगळे डान्सबार बंद करण्याची मोहीम हाती घेण्यासाठी मी योगेश कदम यांना सांगणार आहे,” असे प्रत्युत्तर माजी मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत.