शिवसेना ठाकरे गटानं राखला गड, अनिल परब यांचा मुंबई पदवीधर मतदारसंघात विजय

अनिल परबांच्या विजयानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
शिवसेना ठाकरे गटानं राखला गड, अनिल परब यांचा मुंबई पदवीधर मतदारसंघात विजय

मुंबई: लोकसभा निवडणूकीनंतर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या विधानपरिषद निवडणूकीच्या चार जागांसाठीचं मतदान नुकतंच पार पडलं. मुंबई पदवीधर मतदारसंघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ, नाशिक शिक्षक मतदारसंघ तसेच कोकण मतदारसंघ या चार मतदारसंघातील मतमोजणी आज सुरु आहे. यामध्ये पहिला निकाल हाती आला असून भाजपच्या निरंजन डावखरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघात बाजी मारली आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब यांनी मुंबई पदवीधर मतदासंघात २५००० मतांनी विजय मिळवून गेल्या ३० वर्षांपासूनचा आपला गड अबाधित राखला आहे.

अनिल परबांनी राखला शिवसेना ठाकरे गटाचा गड:

मुंबई पदवीधर मतदारसंघात गेल्या ३० वर्षांपासून शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व राहिलेलं आहे. शिवसेना ठाकरे गटाची ताकद राहिलेला हा मतदारसंघ राखण्याचं आव्हान त्यांच्यापुढं होतं. या मतदारसंघात दीड लाखाच्या आसपास मतदार आहेत. यंदा मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाच्या वतीनं अॅडव्होकेट अनिल परब निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. त्याचवेळी भाजपकडून त्यांच्यासमोर किरण शेलार यांच्या रुपात सक्षम उमेदवार देण्यात आला होता. शेलार यांच्या विजयासाठी भाजपनं कंबर कसली होती. मात्र त्यांची ही मेहनत व्यर्थ ठरली. दरम्यान शिवसेनेचे अनिल परब सुमारे २५ हजार मतांनी विजयी झाले आहेत. अनिल परब यांना ४४७९१ तर १८७७१ त्यांच्या विजयासोबतच शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. नाशिकमध्येदेखील ठाकरे गटाच्या उमेदवारांना आघाडी घेतल्याचं समजतंय.

कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे विजयी-

अत्यंत चुरशीच्या आणि राज्याचं लक्ष लागलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात अखेर भाजपने बाजी मारली. कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे यांनी दोन फेऱ्यांतच ५८ हजार मते मिळवली आहेत. तर काँग्रेसचे रमेश कीर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. विशेष म्हणजे तिसऱ्या फेरीतील मतमोजणी अजून सुरु आहे. मात्र त्यापूर्वीच निरंजन डावखरे यांनी विजयासाठी आवश्यक मतं मिळवली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in