'गाडीत मोबाईल बंद ठेवा...'; अंजली दमानियांना जीवे मारण्याची धमकी

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः फोन करून दमानिया यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात आली असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सिक्युरिटी नाकारली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः फोन करून दमानिया यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात आली असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सिक्युरिटी नाकारली आहे.

अंजली दमानिया यांनी याबाबतची माहिती देत सांगितले की, मी अमेरिकेत असताना मला एका सीनियर अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की त्यांच्या हाताला काही इनपुट मिळाले आहेत की तुमचा गेम केला जाणार आहे. काही लोकांना वाटतंय की ‘यांचा अति होतोय, यांचा गेम करायचाच’, अशा प्रकारच्या चर्चा त्यांच्या कानावर आल्या आहेत.

दमानिया म्हणाल्या, मला पोलिसांकडून सांगण्यात आले आहे की, प्रवासादरम्यान तुम्ही वेळोवेळी वाहने ही बदलून वापरा. तसेच गाडी चालवत असताना स्वत:चा मोबाईल फोन ठेवावा, अशा सूचना करण्यात आल्या.

सुरक्षा घेण्यास दमानियांचा नकार

या सर्व परिस्थितीतही दमानिया यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे. त्या म्हणाल्या, मला सिक्युरिटी घ्यायला सांगितलं आहे. मी एकदा नाही, दोनदा लिहून दिले आहे की, मला सिक्युरिटी नको आहे. मी सिक्युरिटी घेणार नाही. मी माझं काम सुरू ठेवणार आहे. दमानिया यांनी सांगितले की, संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कळवली आहे.

logo
marathi.freepressjournal.in