

मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांच्यासह इतर संबंधित राजकीय नेत्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रविवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली. ज्या राजकीय नेत्यांनी अशोक खरातची भेट घेतली आहे, त्यांनी या संदर्भात लेखी खुलासा द्यावा, असेही दमानिया म्हणाल्या.
खरातप्रकरणी पोलीस अधीक्षकांकडून फक्त जगदंबा आणि समता पतसंस्थेच्या व्यवहारांची चौकशी होत आहे. परंतु रूपाली चाकणकर, सुनील तटकरे, एकनाथ शिंदे, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध पक्षातील नेत्यांचे झालेले व्यवहार कोण तपासणार? हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. माझ्याकडे आलेल्या माहितीनुसार अनेक नेत्यांचे खरातसोबत आर्थिक व्यवहार झाले असून त्यात सीए ललित पोफळे यांचेही व्यवहार समोर आले आहेत. पंचतारांकित हॉटेलांमध्ये खरात सोबत बैठका झाल्याची माहितीही मिळाली आहे. हे सर्व पुरावे मी तीन आठवड्यांपूर्वी एसआयटीकडे पाठवले होते. मात्र, त्यावर चौकशी होत नसल्याने मी पुन्हा पत्र पाठवत असून अशोक खरातशी संबंधित राजकीय नेत्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केल्याचे दमानिया यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी दमानिया यांचे आरोप खोडून काढले. एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन दमानियांकडून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका त्यांनी केली.
कोणत्याही राजकीय नेत्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या अनेक प्रसंगी अशा भेटीगाठी होत असतात. त्यामुळे केवळ भेट झाली म्हणून खरातशी संबंध जोडणे योग्य नाही. या प्रकरणाची चौकशी होऊ द्या. चौकशीत काही त्रुटी आढळल्यास दमानिया यांना न्यायालयात जाण्याचाही पर्याय खुला आहे.