अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्नसाठी शिफारस करणार ;मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

राज्यातील प्रत्येक न्यायालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचा विचार केला जाईल
अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्नसाठी शिफारस करणार ;मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
PM
Published on

नागपूर: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवा, यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे  शिफारस करेल, अशी माहिती प्रभारी मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी  विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

भाजपचे आमदार  सुनील कांबळे यांनी गुरुवारी विधानसभेत मातंग समाजाच्या प्रश्नावर लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी उपस्थित झालेल्या चर्चेला उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले, ‘‘मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग गठित करण्यात आला होता. या आयोगाच्या ६८ शिफारशींची सरकारकडून अंमलबजावणी सुरू आहे. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळातर्फे थेट कर्जपुरवठा वितरित केला जात आहे.’’

‘‘राज्य सरकारने या महामंडळाचे भागभांडवल ३०० कोटी रुपयांवरून १ हजार कोटी केले आहे. बीजभांडवल ४५ टक्के आणि थेट कर्ज मर्यादा २५ हजारांहून १ लाख रुपये करण्यात आले आहे. कर्ज पुरवठ्याबाबत जिल्हा आणि तालुक्यातील अडचणी सोडविण्याचे निर्देश दिले जाईल. कर्जासाठी पात्र असलेल्यांना कर्ज पुरवठा केला जाईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.

‘‘राज्य सरकार मातंग समाजाच्या पाठिशी आहे. मातंग समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार प्रयत्नशील आहे. गायकवाड नवीकरण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना जमीन देण्याचे धोरण आहे. त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे. मातंग समाजासाठीच्या योजनांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी मेळावे घेतले जात आहेत, असेही पाटील म्हणाले. मातंग समाजाचे काही प्रश्न आहेत. त्या सर्व प्रश्नांसाठी अधिवेशन संपल्यानंतर आठ दिवसांत बैठक घेतली जाईल. तसेच राज्यातील प्रत्येक न्यायालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचा विचार केला जाईल, असेही त्यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in