दोन दिवसांत जागावाटप जाहीर करा; ‘वंचित’ची मागणी

लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीत उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस तसेच दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यातील जागावाटप जाहीर झाले
दोन दिवसांत जागावाटप जाहीर करा; ‘वंचित’ची मागणी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) त्यांच्यात ठरलेल्या जागावाटपाची माहिती दोन दिवसांत जाहीर करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. याबाबत वंचितने शनिवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.

महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दोन दिवसाच्या आत त्यांच्या जागासंदर्भात माहिती द्यावी. म्हणजे आम्हाला निर्णय घेणे सोपे जाईल. ही अंतिम मुदत नाही पण आमच्या सोयीसाठी हे आवश्यक आहे. जेणेकरून आम्हाला कोणाशी चर्चा करायची आहे हे समजू शकेल, असे या पत्रात म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीत उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस तसेच दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यातील जागावाटप जाहीर झाले आहे. मात्र, महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील जागावाटप अद्याप रखडले आहे. या पार्श्वभूमीवर वांचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर आणि प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांच्या सहीने आघाडीच्या नेत्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्राला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या पत्रकार परिषदेतील विधानांचा संदर्भ आहे.

२२ फेब्रुवारीच्या पत्रकार परिषदेत चेन्नीथला यांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये ३९ जागांवर एकमत झाले असून, लवकरच २७ किंवा २८ फेब्रुवारीला औपचारिक आणि अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आम्हाला आतापर्यंत अंतिम झालेल्या जागा वाटपासंदर्भात माहिती द्यावी. २ फेब्रुवारीला मुंबईत झालेल्या तीन पक्षाच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीतही आम्ही हीच विनंती केली होती. आघाडीकडून वंचितला तीन पक्षांमध्ये झालेल्या जागा वाटपाची माहिती मिळाल्यास तीन पक्षांना वैयक्तिकरित्या किती जागा लढवण्यासाठी दिलेल्या आहे ते समजण्यात मदत होईल. त्यामुळे त्या संबंधित पक्षासोबत वंचित बहुजन आघाडी काही जागांसाठी वाटाघाटी करू शकेल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

किमान समान कार्यक्रमासाठी आमचे प्रस्तावित ३९ मुद्दे काँग्रेसने स्वीकारल्याचे आम्ही स्वागत करतो. आता शिवसेना , राष्ट्रवादी आणि काँग्रेसने किमान समान कार्यक्रमासाठी त्यांचा मसुदा आम्हाला दाखवावा, असेही या पत्रात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in