विधानसभेला उमेदवार देणार, मनोज जरांगे पाटील यांची घोषणा; आमचेही ओबीसी उमेदवार उभे राहतील -प्रकाश शेंडगे

राज्य सरकारने जर मराठा आरक्षण दिले नाही, तर मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेला उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी १२७ जागांवरचा सर्व्हेदेखील केला आहे.
विधानसभेला उमेदवार देणार, मनोज जरांगे पाटील यांची घोषणा; आमचेही ओबीसी उमेदवार उभे राहतील -प्रकाश शेंडगे
Published on

प्रतिनिधी/मुंबई

राज्य सरकारने जर मराठा आरक्षण दिले नाही, तर मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेला उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी १२७ जागांवरचा सर्व्हेदेखील केला आहे. मनोज जरांगे पाटील स्वत: निवडणूक लढविणार नाहीत. पण उमेदवार उभे करतील. अद्याप राजकीय पक्ष काढायचा की अपक्ष म्हणून उमेदवार उभे करायचे, याचा निर्णय झालेला नाही. दरम्यान, मनोज जरांगे जर उमेदवार उभे करणार असतील तर ओबीसी उमेदवारही उभे राहतील. आमचेही १९९ जागांवर सर्व्हे पूर्ण झाले असल्याचे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केले आहे.

मनोज जरांगे पाटील एका वृत्तवाहिनीशी म्हणाले की, “सरकारला मी वेळ दिलेला नाही, तर सरकारने वेळ घेतला आहे. आम्हाला

राजकारणात येण्याची इच्छा नाही. पण सरकारच आमच्यावर ही वेळ आणत आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण दिले नाही, तर आम्हाला विधानसभा निवडणुकीत उभे रहावे लागेल. १२७ मतदारसंघांत आम्ही सर्व्हे केला आहे. इतर ठिकाणीदेखील सर्व्हे करण्यात येणार आहेत. वेळ पडली तर मराठा, मुस्लिम आणि दलित, लिंगायत यांची मोट बांधून निवडणूक लढवणार आहे. मी स्वत: निवडणूक लढवणार नाही. स्वत:चा पक्ष की अपक्ष हे अजून ठरवलं नाही. मी सर्व मतदारसंघात जाणार आहे.”

आमचाही १९९ मतदारसंघात सर्व्हे पूर्ण -­शेंडगे

दरम्यान, मनोज जरांगे यांना आता ओबीसी समाजाकडूनदेखील प्रत्युत्तर मिळाले आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी आमचाही १९९ मतदारसंघात सर्व्हे पूर्ण झाला आहे. मनोज जरांगे पाटील जर उमेदवार उभे करणार असतील तर ओबीसी उमेदवारही उभे राहतील. निवडणूक कोणाला लढवायची असेल तर तो प्रत्येकाचा संवैधानिक अधिकार आहे, त्याबद्दल मला काही बोलायचे नाही. मराठा समाजाला सरकारने टिकणारे १० टक्के आरक्षण दिले आहे. त्या आरक्षणाची अंमलबजावणी केली असून सरकारने ते आरक्षण घेण्यास मराठा समाजानेदेखील सुरुवात केली आहे. ओबीसीमधील ज्या काही ३७५ जाती अत्यंत मागासलेल्या आहेत. ते आरक्षण जरांगे यांना काढून घ्यायचे आहे. मराठा समाजाला आम्ही आमचा मोठा भाऊ मानतो. पण गरीब समाजातील आरक्षण काढून घेतलं तर हा समाज गप्प कसा बसेल? असा सवाल शेंडगे यांनी केला. आरक्षण हा विषय गरीबी हटवण्याचा कार्यक्रम नाही, तो सामाजिक आहे. जरांगे जर उमेदवार उभे करणार असतील तर ओबीसी उमेदवारही उभा राहतील, असे शेंडगे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in