चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीची शक्यता

वरोऱ्याच्या विद्यमान काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांना महाआघाडीने उमेदवारी दिली आहे. प्रतिभा धानोरकर आणि त्यांचे पती दिवंगत सुरेश उर्फ बाळू धानोरकर हे आधी शिवसेनेचे कार्यकर्ते होते. बाळू धानोरकर यांना चंद्रपूरची लोकसभेची जागा लढवायची होती.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीची शक्यता

अविनाश पाठक

लोकसभा निवडणुकीत विदर्भातील आणखी एक लक्षवेधी लढत ही चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात होणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील विद्यमान वनमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार महायुतीचे उमेदवार म्हणून आपले नशीब आजमावणार आहेत. त्यांची लढत महाआघाडीच्या उमेदवार असलेल्या काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्याशी होणार आहे.

या मतदारसंघात सध्या एकूण १५ उमेदवार रिंगणात आहेत. सुधीर मुनगंटीवार हे गेल्या जवळजवळ ३५ वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. ते १९९५ पासून विधानसभेचे सदस्यही आहेत. आतापर्यंत तीनदा त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदही सांभाळले आहे. विशेषतः राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द लक्षणीय राहिली आहे. जिल्ह्यात त्यांनी विकासकामेही भरपूर केली आहेत. त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. सर्वच समाजांमध्ये त्यांची चांगली उठबस आहे.

वरोऱ्याच्या विद्यमान काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांना महाआघाडीने उमेदवारी दिली आहे. प्रतिभा धानोरकर आणि त्यांचे पती दिवंगत सुरेश उर्फ बाळू धानोरकर हे आधी शिवसेनेचे कार्यकर्ते होते. बाळू धानोरकर यांना चंद्रपूरची लोकसभेची जागा लढवायची होती. त्यांना शिवसेनेत राहून ती संधी मिळणे शक्य नव्हते. कारण त्यावेळी भाजप आणि जुनी शिवसेना यांची युती होती. युतीत ही जागा भाजपकडे होती. त्यामुळे २०१९ मध्ये सुरेश धानोरकर यांनी शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तत्कालीन भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या विरोधात उभे ठाकले.

त्यावेळी त्यांनी हंसराज अहिर यांचा पराभव करून ते विजयी झाले होते. २०१९ मध्ये महाराष्ट्रातून काँग्रेसचे ते विजयी झालेले एकमेव खासदार होते. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यादेखील काँग्रेसच्या उमेदवार म्हणून वरोरा मतदार संघातून विजयी झाल्या. काही महिन्यांपूर्वी सुरेश धानोरकर यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे त्यांच्या पत्नी प्रतिभा यांना सहानुभूतीचा फायदा मिळेल या दृष्टीने काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे.

धानोरकर आणि मुनगंटीवार हे दोन प्रमुख उमेदवार सोडल्यास बसपाचे राजेंद्र रामटेके आणि वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले हे देखील दोन प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. मुनगंटीवार यांच्याकडे भाजपाचे एक गठ्ठा मतदार हाताशी आहेत. रामटेके आणि बेले हे बहुदा महाविकास आघाडीलाच धोका पोहोचवू शकतील असे बोलले जात आहे. त्यामुळे सरळ लढतीत महायुतीला विजय मिळू शकेल असे चित्र आज तरी दिसत आहे. अर्थात या प्रमुख उमेदवारांचे भाग्य १९ एप्रिल ला मशीनबंद होणार असून त्यांच्या भविष्याचा फैसला ४ जूनला जाहीर होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in