पुण्यात पुन्हा 'हिट अँड रन' एका पोलिसाचा मृत्यू, दुसरा जखमी

पुणे व मुंबईतील 'हिट अँड रन' प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील बोपोडी चौकात भरधाव अज्ञात कारने पोलिसांच्या वाहनाला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
पुण्यात पुन्हा 'हिट अँड रन' एका पोलिसाचा मृत्यू, दुसरा जखमी
Published on

पुणे : पुणे व मुंबईतील 'हिट अँड रन' प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील बोपोडी चौकात भरधाव अज्ञात कारने पोलिसांच्या वाहनाला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा सहकारी कर्मचारी यात गंभीर जखमी झाला. सोमवारी मध्यरात्री दीड वाजता हा अपघात झाला.

समाधान कोळी असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तर बीट मार्शल कर्मचारी संजोग शिंदे हे यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुबी हॉल क्लीनिक येथे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या गंभीर आणि दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रुबी हॉलमध्ये जाऊन मयत पोलीस कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांची भेट घेतली, तर जखमी झालेल्या कर्मचाऱ्याची डॉक्टरांकडे विचारपूस केली.

खडकी अंडरपास हॅरिस ब्रीजजवळ हा भीषण अपघात घडला. खडकी पोलीस ठाण्याचे खडकी बाजार बीट मार्शल कर्मचारी संजोग शिंदे आणि पोलीस हवालदार समाधान कोळी हे दोघे एका दुचाकीवर हॅरिस पुलाकडून खडकीच्या दिशेने येत होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अनोळखी कारचालकाने त्यांना जोरात धडक दिली. अपघातानंतर संबंधित कारचालक घटनास्थळी न थांबता भरधाव वेगात निघून गेला. पहाटे एक वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडली आणि यात समाधान कोळी यांचा डोक्यास इजा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पसार झालेल्या अनोळखी वाहनचालकाचा तपास सुरू केला. अपघातानंतर पसार झालेल्या संबधित वाहनचालकाविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.

आरोपीने मद्यपान करून वाहन चालविल्याचा संशय

या अपघातप्रकरणी प्रसार झालेला आरोपी सिद्धार्थ केंगार (रा. बोपोडी, पुणे) याला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. दारूच्या नशेत त्याने वाहन चालविल्याचा पोलिसांना संशय असून त्याची खातरजमा करण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने पोलिसांनी घेतले आहे. याबाबत खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर म्हणाले, आरोपीने मद्य प्राशन केले होते की नाही, याबाबत त्याच्या रक्ताचा नमुन्याचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. अपघातग्रस्त गाडी ही बाणेर येथील रहिवासी मुकेश आटवल यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. त्यांनी रॉबिन नावाच्या मित्राकडे ती सव्र्व्हिसिंग कामासाठी दिली होती. सिद्धार्थ केंगार याला सदर गाडी त्याने दिल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे.

आरोपीवर ३०४ कलम लावले

आरोपी सिद्धार्थ केंगार हा साई सर्व्हिस याठिकाणी मेकॅनिक आहे. अपघातानंतर घरापासून काही अंतर दूर गाडी लावून तो घरी जाऊन झोपी गेला होता. त्याच्यावर पोलिसांनी भादंवि कलम ३०४ नुसार कारवाई केली आहे. अपघातापूर्वी बेपत्ता मुलीस घरी सुखरूप पोहोचवले 'हिट अँड रन' प्रकरणाच्या अगोदरच्या रात्री १ वाजून ७ मिनिटांनी गस्तीवर असलेले पोलीस हवालदार समाधान कोळी आणि संजय शिंदे यांना खडकी भागातील बस स्टॉपवर मध्यरात्री ११ वर्षांची मुलगी आढळून आली होती. या दोघांनी तिच्याकडून आई-वडिलांचा नंबर घेतला होता. ती पिंपळे सौदागर भागात रहात असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर या दोघांनी मुलीच्या आई-वडिलांना बोलावले होते व खातरजमा करून मुलीला सुखरूप त्यांच्याकडे सोपवले. तसा फोटो पोलीस हवालदार समाधान कोळी आणि संजय शिंदे यांनी पोलिसांच्या ग्रुपवर पोस्ट केला होता. यानंतर दोघे खडकी बाजार भागातून बोपोडी भागात आले असताना एक वाजून ३६ मिनिटांनी हा अपघात झाला. त्यातच समाधान कोळी यांचा मृत्यू झाला.

पत्रकाराला वाहनाने उडवले

मुंबई-बेंगळुरू महामार्गावर डिकेथलॉनसमोरील महामार्ग ओलांडत असताना मुंबईकडून येणाऱ्या लेनवरील ट्रकने जोरात धडक दिल्याने शरद वसंत गायकवाड (४२) या पत्रकाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. गायकवाड हे पिंपरी चिंचवड शहरात पत्रकार म्हणून काम करत होते आणि 'न्यूज २४' या वेब पोर्टलचे कामकाज ते पाहत होते.

आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू

दरम्यान, आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोलीस हवालदार सचिन विष्णू माने (४८) हे अॅक्टिवावरून कोकणे चौक ते नाशिक फाटा प्रवास करत असताना पिके चौकाजवळ, पिंपळे सौदागर येथे अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

logo
marathi.freepressjournal.in