आणखी एक प्रकल्प परराज्यात, अंबादास दानवे यांचा आरोप

केंद्र सरकारच्या दबावामुळे महाराष्ट्रात येऊ घातलेली गुंतवणूक प्रकल्प परराज्यात जात असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी समाजमाध्यमातून केला.
आणखी एक प्रकल्प परराज्यात, अंबादास दानवे यांचा आरोप

मुंबई : केंद्र सरकारच्या दबावामुळे महाराष्ट्रात येऊ घातलेली गुंतवणूक प्रकल्प परराज्यात जात असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी समाजमाध्यमातून केला. महाराष्ट्रातील गुंतवणूक पळवून पंतप्रधान हे महाराष्ट्रावर बेगडी प्रेम दाखवत आहेत. राज्यातील तरुणांच्या हाताला मिळणारा रोजगार हिसकावून दुसऱ्याच्या घशात घालण्याचे पाप भाजप करत असल्याची टीकाही दानवे यांनी केली.

महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असलेले अनेक प्रकल्प यापूर्वीच परराज्यात गेले असताना आता अजून एक प्रकल्प परराज्यात गेल्याचा दावा दानवे यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्रातील बातमीच्या आधारे केला आहे. यावरून दानवे यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमातून राज्य सरकारला जाब विचारला आहे. तसेच राज्यात येणारी गुंतवणूक कमी होत असल्यामुळे राज्य अधोगतीला जाते की काय, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने दबाव टाकला का?

सदर कंपनीने प्रकल्प उभारणीच्या जागेसाठी विचारणा केली होती का? विचार केला होता तर त्यांनी महाराष्ट्रात प्रकल्प का नाकारला? सरकारी कंपनी असल्याने मध्य प्रदेशात हा प्रकल्प नेण्यासाठी केंद्राने दबाव टाकला का? याची उत्तरे सरकारने द्यावी, असेही दानवे यांनी म्हटले आहे.

५० हजार कोटींचा गुंतवणूक प्रकल्प आता मध्य प्रदेशात

राज्यातील छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोळ येथे ‘गेल इंडिया’ ही पेट्रोकेमिकल्स कंपनी ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होती. या गुंतवणुकीच्या माध्यमातून इथेन क्रॅकिंग युनिट उभारले जाणार होते. आता हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता मध्य प्रदेशच्या सिहोर येथे उभारला जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्राचा विचार करत असताना मध्य प्रदेशात कसा गेला? महाराष्ट्राचा वाट्याला येणारा रोजगार असा सहज बाहेर कसा गेला? याचे उत्तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री यांनी द्यावे, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in