विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ

आणखी एक आमदार शरद पवार गटात? अजित पवार यांना धक्का; झिरवळ यांची मविआच्या बैठकीत हजेरी

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे गुरुजी यांच्यात लढत होत आहे.

विशेष प्रतिनिधी/मुंबई

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे गुरुजी यांच्यात लढत होत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद मोठी आहे. तसेच शरद पवार यांना मानणारा वर्गही मोठा आहे. त्यातच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने भाजपवर प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे भारत पवार यांच्यासमोर तगडे आव्हान आहे. त्यासाठी महायुतीच्या नेत्यांत ऐक्य घडवून आणून हा मतदारसंघ कायम राखण्यासाठी भारती पवार यांचे प्रयत्न आहेत. त्यासाठी प्रथम त्यांनी घरातील वाद मिटविला. परंतु अजूनही महायुतीतील बरेच नेते सक्रीय दिसत नाहीत. याबाबत चर्चा सुरू असताना दिंडोरीत महाविकास आघाडीच्या बैठकीत थेट विधानसभेचे माजी उपसभापती नरहरी झिरवळ यांनी हजेरी लावली. त्यामुळे अजित पवार गटाचे आणखी एक आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. हा अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

महायुतीत एक-एक खासदार निवडून आणण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. तसेच स्वपक्षीयांसह मित्र पक्षांतील नाराजी दूर करून मतदारसंघात एकजूट कशी वाढवता येईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दिंडोरीत भारती पवार यांच्याबाबत नाराजी वाढली आहे. त्यांना विरोध होऊनही येथे उमेदवारी बदललेली नाही. त्यामुळे महायुतीत अस्वस्थता असतानाच दुसरीकडे विरोधी गटातील राष्ट्रवादी शरद पवार गटाने भास्कर भगरे गुरुजींच्या रूपात एक नवा चेहरा मैदानात उतरविण्यात आला. त्यामुळे सुरुवातीला फारसे आव्हान उभे राहील का, याबाबत सांशकता होती. परंतु भगरे गुरुजी मैदानात उतरताच मतदारसंघातून चांगला प्रतिसाद मिळायला लागला. त्यातच या मतदारसंघात माकपची ताकदही जास्त आहे. त्यामुळे त्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते. त्यातल्या त्यात जे. पी. गावित काय भूमिका घेणार, याची चिंता असतानाही राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली. त्यानंतर महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे भारती पवार यांच्यासमोर आव्हान उभे ठाकले आहे.

मतदानाचा दिवस जसा जवळ येईल, तसे मतदारसंघातील चित्र बदलत चालले आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील स्थितीचा आढावा आणि पुढील रणनिती ठरविण्यासाठी महाविकास आघाडीच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. या बैठकांना विधानसभेचे माजी उपसभापती तथा अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ हे बैठकांना हजेरी लावत आहेत. त्यामुळे हा महायुतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे आता झिरवाळही शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. नरहरी झिरवाळ आदिवासी नेते आहेत. या मतदारसंघात मुळातच आदिवासांवर फार मोठी भिस्त आहे. त्यामुळे झिरवाळ यांच्या हजेरीने राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद वाढली असून, भारती पवार यांच्यासमोर तगडे आव्हान उभा ठाकले आहे. या अगोदर शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी थेट अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर शंका घेत ते दिंडोरीत शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासाठी प्रचार करीत असल्याची जाहीर तक्रार केली आहे. एवढेच नव्हे, तर याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे म्हटले आहे. हा वाद रंगलेला असतानाच झिरवळ थेट महाविकास आघाडीच्या बैठकीत हजर झाले. त्यामुळे महायुतीला धक्का मानला जात आहे. दरम्यान, यासंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता अशा गाठीभेटी सुरू राहतात. त्यातल्या त्यात नरहरी झिरवळ आणि भास्कर भगरे दिंडोरीतील नेते आहेत. त्यामुळे त्यांची जवळीकता आहे. त्यात भास्कर भगरे जिल्हा परिषदेत आमच्यासोबत होते. त्यामुळे त्यांच्या गाठी-भेटी असतील, त्यापेक्षा अधिक माहीत नाही, असे त्यांनी सांगितले.

दिंडोरीची जागा भाजपकडे गेल्याने नाराजी

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार जास्त आहेत. येथे अजित पवार गटाचे प्राबल्य असताना त्यांना ही जागा सोडली गेली नाही. अर्थात, भाजपच्या भारती पवार या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्या विद्यमान खासदार असल्याने पुन्हा येथून त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यातच या अगोदर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून झिरवळ यांच्या मुलानेही उमेदवारी मागितली होती. त्यामुळे झिरवळ हे अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्यासोबत जाणार का, अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

logo
marathi.freepressjournal.in