पुन्हा राजकीय 'भूकंप', अशोक चव्हाण यांचा काँग्रेसला रामराम : भाजपमध्ये जाण्याची शक्यता

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य, ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला आहे.
पुन्हा राजकीय 'भूकंप', अशोक चव्हाण यांचा काँग्रेसला रामराम : भाजपमध्ये जाण्याची शक्यता

प्रतिनिधी/मुंबई

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य, ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला आहे. आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा तसेच काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिला आहे. पुढल्या राजकीय भूमिकेबद्दल आपण अद्याप काही निर्णय घेतलेला नाही. येत्या एक ते दोन दिवसांत आपण पुढील भूमिका स्पष्ट करू. मी कोणत्याही आमदाराशी संपर्क साधलेला नाही, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले असले तरी ते भाजपमध्येच जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. येत्या एक ते दोन दिवसांत महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसचा आणखी एक अंक पार पडणार आहे. काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आगे आगे देखो होता है क्या, असे सूचक वक्तव्य करत या शक्यतांना दुजोराच दिला आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

सोमवारी सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक राजकीय भूकंप घडला. सोमवारी सकाळी अशोक चव्हाण यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. त्यानंतर अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. अशोक चव्हाण यांचा फोन नॉट रिचेबल होता. मात्र नंतर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा तसेच काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिल्याचे स्पष्ट झाले. अशोक चव्हाण माध्यमांशी बोलताना म्हणाले, आज मी विधानसभाध्यक्षांना भेटून काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेस कार्यसमिती, पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचाही मी राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये असताना मी प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. कोणाबद्दल मी तक्रार करणार नाही. वैयक्तिक कोणाबद्दलही माझ्या मनात वेगळी भावना नाही. पुढील राजकीय दिशेबाबत अद्याप मी काहीही निर्णय घेतलेला नाही. याबाबत विचार करून एक-दोन दिवसांत माझी भूमिका स्पष्ट करेन, असे ते म्हणाले.

गेल्या अनेक दिवसांपासून अशोक चव्हाण यांच्या भाजपप्रवेशाबाबत चर्चा सुरू होती. मात्र अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडूनही या सर्व बिनबुडाच्या बातम्या असल्याचे स्पष्ट करण्यात येत होते. पण सातत्याने या चर्चा सुरू होत्या. सोमवारी या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभाध्यक्षांना भेटून दिला आहे. मी काँग्रेस वर्किंग कमिटी, विधिमंडळ काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं आहे. मला कुणाबद्दल तक्रार करायची नाही. माझ्या मनात कोणाहीबाबत वैयक्तिक भावना नाही. पक्षात होतो तोपर्यंत मी पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले आहे. पक्षाने मला भरपूर दिले हे खरे असले, तरी मी पक्षासाठीही खूप केले आहे. भाजपची कार्यप्रणाली मला माहिती नाही. भाजपमध्ये जाण्याबाबत मी अद्याप तरी निर्णय घेतलेला नाही. येत्या एक-दोन दिवसांत माझ्या पुढच्या राजकीय भूमिकेबाबत विचार करून निर्णय घेईन, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

राज्यात येत्या काही दिवसांत पुन्हा ऑपरेशन लोटस

अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांचे खंदे समर्थक विधानपरिषदेचे माजी आमदार अमर राजूरकर यांनीही काँग्रेसला रामराम ठोकला आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे आणखी दहा ते पंधरा आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या मनस्थितीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपकडून राज्यात ऑपरेशन लोटसची पुनरावृत्ती होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आगे आगे देखो होता है क्या असे सूचक वक्तव्य करत येत्या काही दिवसांत आणखी मोठा राजकीय भूकंप होणार असल्याच्या शक्यतेला दुजोराच दिला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडली. विरोधी तीन पक्षांतील काँग्रेस हाच एकमेव पक्ष होता की ज्यात मोठ्या प्रमाणात बंडाळी किंवा फूट पडली नव्हती, पण आता काँग्रेसलाही धक्का बसला आहे.

logo
marathi.freepressjournal.in