बारामतीत अजून एक 'तुतारी'; शरद पवार गटाची निवडणूक आयोगात धाव

बारामतीमध्ये शरद पवार यांच्या गटाकडून सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार अशी लक्षवेधी लढत होत आहे. अशातच अपक्ष उमेदवार सोयल शहा युनूस शहा शेख यांनीही या मतदारसंघातून अर्ज भरला आणि त्यांनी मुक्त चिन्हांमधील ‘तुतारी’ या चिन्हाची मागणी केली होती.
बारामतीत अजून एक 'तुतारी'; शरद पवार गटाची निवडणूक आयोगात धाव
Published on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचं मूळ चिन्ह आणि नाव दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले. तर, 'तुतारी फुंकणारा माणूस' आणि 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' असे नवे चिन्ह आणि नाव शरद पवार यांना देण्यात आले. मात्र, आता याच नव्या चिन्हामुळे शरद पवार गटासमोर बारामती मतदारसंघात नवी अडचण उभी राहिली आहे.

बारामतीमध्ये शरद पवार यांच्या गटाकडून सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार अशी लक्षवेधी लढत होत आहे. अशातच अपक्ष उमेदवार सोयल शहा युनूस शहा शेख यांनीही या मतदारसंघातून अर्ज भरला आणि त्यांनी मुक्त चिन्हांमधील ‘तुतारी’ या चिन्हाची मागणी केली होती. त्यांची मागणी मान्य करत निवडणूक आयोगाने शेख यांना तुतारी चिन्ह बहाल केल्याने शरद पवार गटात आता गोंधळ निर्माण झाला आहे. खरंतर शेख यांना आयोगाने 'ट्रम्पेट' हे चिन्ह देऊ केले आहे, मात्र 'ट्रम्पेट'चे मराठीत भाषांतर तुतारी असे होते, त्यामुळे 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाने यावर आक्षेप घेतला आहे. तसे पत्र देखील सुप्रिया सुळेंच्या वतीने निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले आहे.

उमेदवारांची नेमकी संख्या निश्चित झाल्यावर चिन्हाचं वाटप -

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी २२ एप्रिल ही शेवटी तारीख होती. निवडणूक आयोगाने बारामती मतदारसंघातील उदमेवारांच्या अर्जाची छाननी केल्यानंतर ४६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले असून ५ जणांचे अर्ज बाद केले आहेत. तर, ८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघात ३८ उमेदवार निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले. बारामतीमधील उमेदवारांची नेमकी संख्या निश्चित झाल्यावर निवडणूक आयोगाकडून अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. शेख यांची ट्रम्पेटला पसंती होती, त्यानुसार त्यांना ते चिन्ह देण्यात आले. दरम्यान, शेख हे मूळ बीडचे रहिवासी असून त्यांनी बारामती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. आता शरदचंद्र पवार पक्षाच्या तक्रारीवर आयोग काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in