आळंदीत वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचं प्रकरण ताज आहे. यावरुन विरोधी पक्षानं पोलिसांच्या वागणूकीवर आणि सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली. यानंतर आता या प्रकरणाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत पोलीस वारकऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असताना काही तरुण नियम डावलून पोलिसांना धक्काबुक्की करत मागे ढकलत आहेत. तर काही पोलिसांना तुडवत मंदिराच्या दिशेनं धावत असल्याचं दिसून येत आहे. रविवार 11 जून रोजी आळंदी देवाची येथून माऊलींच्या पालखीचं प्रस्तान होणार होतं. यावेळी दर्शनासाठी मंदिरात जाण्यावरुन वारकरी आणि पोलीस यांच्यात हुज्जत झाली होती. यात पोलिसांकडून वारकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला होता.
यावेळी ज्ञानोबांच्या संजीवन समाधी मंदिराच्या समोर काही तरुणांनी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्यांना मंदिरात शिरण्यापासून रोखत त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज केला होता. मात्र, पोलिसांनी कोणताही लाठीमार केला नाही, ती किरकोळ झटापट होती, असा खुलासा पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केला होता. विरोधी पक्षांनी मात्र या घटनेवरुन राज्य सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला. यात या नव्या व्हिडिओनं या वादाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.