
नांदेड : मराठा आरक्षणासाठी जालना येथील एका युवकाने मुंबईत भर रस्त्यात आत्महत्या केल्यानंतर रविवारी नांदेड जिल्ह्यातील वडगाव येथे एका युवकाने आत्महत्या केली आहे. ‘एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असा मजकूर लिहून शुभम सदाशिव पवार या २४ वर्षीय तरुणाने विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. शुभम पवार हा प्लंबरचे काम करत होता. शनिवारी सकाळी तो मुंबईहून नांदेडला आला. बहिणीला भेटून गावाकडे येतो, असा निरोप त्याने वडिलांना फोन करून दिला, मात्र शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी शोधशोध करून तामसा पोलिसांना कळवले.
पोलिसांनी शुभमच्या मोबाईल लोकेशनवर त्याचा माग काढला. त्यावरून तो अर्धापूर-तामसा रोडवरील नरहरी मंगल कार्यालयाच्या बाजूस गर्द झाडीत असल्याचे समजले. तामसा पोलिसांनी ही बाब अर्धापूर पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनासथळी जाऊन पाहिले असता, शुभम मृत्तावस्थेत आढळला. त्याच्या शेजारी वरील प्रमाणे मजकूर लिहलेली चिठ्ठी सापडली. अर्धापूर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.