
कराड : लाच घेताना रंगेहात पकडलेल्या साताऱ्यातील न्यायाधीशाच्या जामीन प्रकरणी सोमवारी मुंबई हायकोर्टाने लाचखोरीचा आरोप असलेल्या न्यायाधीशांना जामीन देण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळून लावली. सातारा न्यायालयातील न्यायाधीश धनंजय निकम असे या न्यायाधीशांचे नाव आहे.
एका प्रकरणात आरोपीला जामीन देण्याकरिता ५ लाखांची लाच घेतल्याचा न्या. धनंजय निकम यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. दरम्यान, सातारा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला न्या. निकम यांनी मुंबई हायकोर्टात दिलेली आव्हान याचिका फेटाळण्यात आली. न्या. निकम यांनी त्यांचे निकटवर्तीय खरात बंधूंमार्फत लाच मागितल्याची सातारा एसीबीकडे तक्रार आली होती. सदर तक्रारीनुसार सातारा एसीबीने कारवाई केली होती. मात्र न्या. निकम यांनी सर्व आरोप फेटाळले असले तरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात न्या. निकम यांचा यात सहभाग असल्याचे पुरावे हायकोर्टाकडून ग्राह्य धरण्यात आलेले आहेत.