मुंबई : अवघ्या पंधरवड्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनमोहक गणेशमूर्तीसह गणेशोत्सवासाठी लागणारे विविध पूजा साहित्य, गणेश आराससाठी लागणाऱ्या शोभेच्या वस्तू तसेच खाद्यपदार्थ व मिठाई यांचे आकर्षक पॅकेज तयार करून ते ग्राहकांसाठी एकाच पॅकेटमध्ये उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती ‘अपना बाजार’चे कार्याध्यक्ष अनिल गंगर यांनी ‘नवशक्ति’ला दिली.
यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अगरबत्ती, कापूर, उपवासाचे पदार्थ, शेंगदाणे, लोणची यावर विशेष सूट देण्यात येत आहे. तसेच, आगामी दसरा, दिवाळी सणानिमित्त जवळपास रवा, मैदा, पोहे, ड्रायफ्रूट्स यासह जवळपास ४० वस्तूंवर सवलती देण्यात येणार आहेत. याशिवाय, ‘एकावर एक फ्री’ देण्याचीही योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संकटात अखंड सेवा
महागाई, दंगली, दुष्काळ, अतिवृष्टी, कोरोनासारख्या संकटकाळात ग्राहकांना दिलासा देण्याबरोबरच सरकारला आवश्यक मदतीचा हात देण्याचे काम ‘अपना बाजार’ने केले आहे. त्याबद्दल शासनाच्या पणन संचालकांमार्फत सेवाभावी संस्थेचा दर्जा प्राप्त झाला आहे. तसेच, प्रतिष्ठेचा जमनालाल बजाज पुरस्कार आमच्या संस्थेला तब्बल पाच वेळा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजवादी नेत्यांची साथ
साथी दादासाहेब सरफरे यांच्या पुढाकाराने व समाजवादी नेते नानासाहेब गोरे, मधू दंडवते, एस. एम. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गिरणी कामगारांच्या पाठबळाच्या जोरावर ९ मे १९४८ रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘अपना बाजार’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर नायगावसारख्या मुंबईच्या मध्य भागात १९६८ मध्ये ‘अपना बाजार’ची बहुमजली इमारतही दिमाखात उभी राहिली. ‘अपना बाजार’चा कोकणात विस्तारण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहितीही गंगर यांनी दिली. अपना बाजारची वार्षिक उलाढाल १०७ कोटी रुपयांची असून ४० लाखांहून अधिक ग्राहक आहेत. दर्जेदार वस्तू, किफायतशीर दर आणि विश्वासार्ह सेवा याच भांडवलावर आमची घोडदौड सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
उत्सव, महोत्सवानिमित्त खास सवलती
अपना बाजारमार्फत एप्रिल-मे दरम्यान मसाले महोत्सव आयोजिण्यात येत असून त्याला महिलावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. डिसेंबर ते जानेवारीदरम्यान तांदूळ महोत्सवही भरविला जात असून त्यात १८ ते २० प्रकारचे तांदूळ उपलब्ध केले जात आहेत. मकर संक्रांतीसाठी पॉलिश तीळ, सफेद तीळ, चिक्कीचा गूळ यासह छोट्या गुळाच्या ढेपी व अन्य वाणसाहित्यही उपलब्ध केले जात आहे. होळी व महिला दिनानिमित्तही विविध वस्तू, गिफ्ट कूपन, भेटवस्तू खास सवलतीच्या दरात दिल्या जात आहेत.