आता ॲॅप आधारित रिक्षा, टॅक्सी व ई-बाइक सेवा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

राज्यातील विशेष करून मराठी तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्य सरकारने राज्यात ई-रिक्षा, टॅक्सीसह ई-बाईक सेवा सुरू करण्याची चाचपणी सुरू केली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र FPJ
Published on

मुंबई : राज्यातील विशेष करून मराठी तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्य सरकारने राज्यात ई-रिक्षा, टॅक्सीसह ई-बाईक सेवा सुरू करण्याची चाचपणी सुरू केली आहे. ॲॅप आधारित रिक्षा, टॅक्सी व ई-बाइक सेवा अंमलात आल्यावर खासगी कंपन्यांच्या मक्तेदारीला लगाम बसणार आहे. परिवहन विभागाच्या सहकार्याने सुरू करण्यात येणाऱ्या या ॲपला जय महाराष्ट्र, महा राईड, महा यात्री, महा गो यापैकी एखादे नाव देणे प्रस्तावित आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंतिम मान्यतेने सदर शासकीय ॲप लवकरच कार्यान्वित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपक्रमांतर्गत अ‍ॅप विकसित करण्यासाठी ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी’ आणि ‘मित्र’ या संस्थेसह खासगी कंपन्यांशी चर्चा सुरू करण्यात आली आहे. यंत्रणेत पारदर्शकता ठेवण्यासाठी लवकरच अ‍ॅप तयार होणार आहे. बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार देण्यासाठी मुंबै बँकेच्या माध्यमातून वाहन खरेदीसाठी १० टक्के व्याजदराने कर्ज दिले जाणार आहे, अशी ग्वाही मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली.

बेरोजगार तरुण-तरुणींना अर्थसहाय्य !

मुंबै बँकेच्या मदतीने बेरोजगार तरुण-तरुणींना अर्थसहाय्य उपलब्ध होईल. तसेच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटके विमुक्त महामंडळ, ओबीसी महामंडळ आणि एमएसडीसी या संस्थांतर्फे ११ टक्के व्याज परतावा अनुदानाच्या स्वरूपात दिला जाणार आहे. त्यामुळे हे कर्ज बिनव्याजी असल्यासारखे आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in