महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांचा फेर मतमोजणीसाठी अर्ज

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील अकराही मतदारसंघांत महायुतीने मिळवलेल्या यशाचा महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांना धक्का बसला आहे. महायुतीच्या यशावर महाविकास आघाडीच्या तीन पराभूत उमेदवारांनी संशय घेत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे फेर मतमोजणीची मागणी केली आहे. त्यासाठी आवश्यक ते शुल्क देखील भरले आहे.
सतीश पाटील, रोहिणी खडसे, वैशाली सूर्यवंशी (डावीकडून)
सतीश पाटील, रोहिणी खडसे, वैशाली सूर्यवंशी (डावीकडून)
Published on: 

जळगाव : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील अकराही मतदारसंघांत महायुतीने मिळवलेल्या यशाचा महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांना धक्का बसला आहे. महायुतीच्या यशावर महाविकास आघाडीच्या तीन पराभूत उमेदवारांनी संशय घेत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे फेर मतमोजणीची मागणी केली आहे. त्यासाठी आवश्यक ते शुल्क देखील भरले आहे.

महायुतीने विधानसभा निवडणुकीत जे अभूतपूर्व यश मिळवले, त्यामुळे सत्तेची स्वप्न पाहणारी महाविकास आघाडी अपेक्षाभंगाने हादरली असून ते आता ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करत असून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करत आहेत. जळगाव जिल्ह्यात देखील महायुतीने सर्व अकरा जागा जिंकल्याने महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांचे राजकीय अस्तित्वच धोक्यात आले आहे. यातून त्यांनी फेर मतमोजणीची मागणी करत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे अर्ज दाखल केला आहे.

मुक्ताईनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्षा व एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी पराभव केला. २०१९ मध्ये देखील चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा पराभव केला होता. यंदाचा पराभव चांगलाच जिव्हारी लागला असून रोहिणी खडसे यांनी निकालावर आक्षेप घेत १६ मतदान केंद्रातील मतदान यंत्र व व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या यांच्या पडताळणीची मागणी निवडणूक विभागाकडे केली असून निवडणूक शाखेत यासाठी ७ लाख ५५ हजार रुपयाची शासकीय फी देखील जमा केली आहे.

एरंडोल मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी देखील ५ बूथवरील फेर मतमोजणीची मागणी केली आहे त्यासाठी त्यांनी ४५ हजार रुपये शुल्क भरले आहे. सतीश पाटील यांचा पराभव शिेदे गटाचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांनी केला. तर पाचोरा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उबाठाच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांचा पराभव शिंदे गटाचे उमेदवार किशोर पाटील यांनी केला. ही अत्यंत चुरशीची निवडणूक मानली जात होती.

या निकालावर वैशाली सूर्यवंशी यांनी आक्षेप घेतला असून फेर मतमोजणीचा मागणी केली आहे. निवडणूक विभागामार्फत या तिघांचे अर्ज निवडणूक विभागाला पाठवण्यात येणार असून निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in