इतरांच्या मुलांना मंत्रिपद, तोच न्याय मला लावा; नाराज भुजबळांची भूमिका

‘इतरांची मुलं जशी राज्यसभेवर, लोकसभेवर आणि इकडे मंत्री आहेत. त्यामुळे इतरांप्रमाणे मलाही न्याय मिळाला पाहिजे ही माझी मागणी आहे.
इतरांच्या मुलांना मंत्रिपद, तोच न्याय मला लावा; नाराज भुजबळांची भूमिका
इतरांच्या मुलांना मंत्रिपद, तोच न्याय मला लावा; नाराज भुजबळांची भूमिका
Published on

मुंबई : ‘इतरांची मुलं जशी राज्यसभेवर, लोकसभेवर आणि इकडे मंत्री आहेत. त्यामुळे इतरांप्रमाणे मलाही न्याय मिळाला पाहिजे ही माझी मागणी आहे. या पक्षाच्या स्थापनेपासून मीदेखील काम केले आहे’, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी आपली नाराजी व्यक्त केली. मात्र त्याचवेळी,  त्यांच्या नाराजीचा रोख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर  आपली वर्णी लावावी व पुतण्या समीरचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी अट भुजबळ यांनी पक्षासमोर ठेवली होती. मात्र, ती मान्य झाली नाही. पक्षाने राज्यसभेसाठी   वरिष्ठ नेते  प्रफुल पटेल  यांचे निकटवर्तीय आणि माजी आमदार राजेंद्र जैन यांना  उमेदवारी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना भुजबळ यांनी आपल्या    नाराजीला वाट मोकळी करून दिली. त्याचवेळी मी नाराज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपकडे माझा प्रस्ताव मांडल्यानंतर निर्णय घेण्यासाठी एकच दिवस उरला होता. त्यावर भाजपकडून असे उत्तर आले की, मंत्रिमंडळ विस्तारावेळी विचार करण्यात येईल. त्यामुळे भाजपने प्रस्ताव नाकारला या गोष्टीत तथ्य नाही, असे भुजबळांनी स्पष्ट केले.

बुध्दीबळ आणि कबड्डी

मी कब्बड्डीचा खेळाडू आहे, बुद्धीबळाचा खेळाडू नाही. मला बुद्धिबळ कळत नाही’, अशा शब्दात भुजबळांनी टोला हाणला. यावर सुनील तटकरे म्हणाले की, छगन भुजबळ हे कब्बड्डीचे उत्कृष्ट खेळाडू आहेत, ते बुद्धीबळही चांगले खेळतात. भुजबळांची ती बोलण्याची शैली आहे. ते माझ्याबद्दल बोलले असतील असे मी मानत नाही. माझा राजकीय प्रवास आणि कारकीर्द त्यांना चांगली माहिती आहे. त्यांचा मान मोठा आहे. त्यांना अभिप्रेत गोष्टी यापूर्वी घडल्या आहेत आणि पुढेही घडतील, असे तटकरे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in