अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी निलंबित; औरंगजेबाची प्रशंसा भोवली!

औरंगजेबाची प्रशंसा करणे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना चांगलेच भोवले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत सपा आमदार अबू आझमी यांचे सदस्यत्व निलंबित करण्याचा निर्णय बुधवारी विधानसभेत घेण्यात आला.
आ. अबू आझमी
आ. अबू आझमीसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : औरंगजेबाची प्रशंसा करणे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना चांगलेच भोवले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत सपा आमदार अबू आझमी यांचे सदस्यत्व निलंबित करण्याचा निर्णय बुधवारी विधानसभेत घेण्यात आला. त्यामुळे आता अधिवेशन सुरू असेपर्यंत आझमी यांना विधानभवन परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, आझमी यांचे सदस्यत्व निलंबित केल्यानंतर ‘जय शिवाजी, जय भवानी’ अशी जोरदार घोषणाबाजी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली. “छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान देशातील जनता कधीही खपवून घेणार नाही. महाराजांचा अवमान करणाऱ्याचे कायमस्वरूपी निलंबन केले पाहिजे,” अशा कडक शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आझमींना सुनावले.

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मंगळवारी विधिमंडळ परिसरात ‘औरंगजेब उत्तम प्रशासक होते,’ असे म्हणत औरंगजेबाची प्रशंसा केली. औरंगजेबाच्या राजवटीत भारताच्या सीमा अफगाणिस्तानपासून म्यानमारपर्यंत पसरल्या होत्या, भारताचा जीडीपी जगाच्या जीडीपीच्या २४ टक्के होता, म्हणून औरंगजेबाला एक चांगला शासक म्हटले पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात कोणताही धार्मिक किंवा सांप्रदायिक संघर्ष नव्हता, तर तो राज्यकारभारासाठीचा संघर्ष होता, असेही ते म्हणाले होते.

आझमी यांच्या या वक्तव्यानंतर विधिमंडळ परिसर, विधानसभा व विधान परिषदेत आझमींविरोधात महायुती व महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले होते. आझमी यांचे निलंबन करा, अशी मागणी मविआ नेत्यांनी लावून धरली. तर महायुतीच्या नेत्यांनी जोरदार आंदोलन करत घोषणाबाजी केली. तसेच आझमी यांचे निलंबन करा, अशी मागणी केली. मंगळवारी विधानसभेचे कामकाज याच मुद्द्यावरून स्थगित करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सत्ताधारी आमदारांनी आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांचे सदस्यत्व निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली होती.

बुधवारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता हे आझमींचे वक्तव्य अतिशय गंभीर आहे. त्यांचे सदस्यत्व अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात यावे. तसेच त्यांना या कालावधीत विधानभवन आवारात प्रवेशबंदी करण्यात यावी, असा हा प्रस्ताव होता. भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी जुने दाखले देत केवळ अधिवेशन संपेपर्यंत निलंबन न करता, त्यांचे सदस्यत्व निलंबित करावे, अशी मागणी केली. हवे तर यासाठी आमदारांची समिती नेमा. तोपर्यंत त्यांचे सदस्यत्व निलंबित करा, असे मुनगंटीवार म्हणाले.

काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार यांनी, औरंगजेबाचे समर्थन कोणी करू शकत नाही. तो नालायकच होता. मुस्लिम लोकांमध्येही कोणी मुलांचे नाव औरंगजेब ठेवत नाहीत, असे स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारच्या काळात भाजपचे १२ सदस्य निलंबित झाले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. तेव्हा न्यायालयाने निलंबन एका अधिवेशनापुरतेच करता येऊ शकते, असा निर्णय दिल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव मतास टाकला. बहुमताने हा प्रस्ताव संमत झाल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

पुन्हा असे बोलण्याची हिंमत होता कामा नये -उद्धव ठाकरे

अबू आझमी यांना किती दिवसांसाठी निलंबित केलेय हे महत्त्वाचे आहे. त्यांना कायमचे निलंबित करावे. ते फक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनापुरतेच नसावे. ५ वर्षांसाठी निलंबित करणे ही सरकारची जबाबदारी आहे. पुन्हा असे बोलण्याची कोणाची हिंमत होता कामा नये. त्यांच्यावर कठोरात कठोर शासन सरकारने केले पाहिजे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अबू आझमींना फटकारले.

logo
marathi.freepressjournal.in